परीक्षण – सदानंददायी गझल

>> साबिर सोलापुरी /बदीउज्जमा बिराजदार

गझल गीत, अभंग गीतिका, नाटय़गीत या अवघड काव्य प्रकाराबरोबरच कवितेचे जवळपास सर्व प्रकार तरलतेनं अन् प्रगल्भतेनं लिहिणारे गझलकार म्हणून सदानंद डबीर हे नामवंत नाव काव्यरसिकांना सर्वविदित आहे. लेहरा, खयाल, आनंदभैरवी साकिया, काळीजगुंफा, अलूफ या त्यांच्या पुस्तकांच्या शीर्षकांवरून ओझरती नजर फिरविली तरी त्यांच्या लेखनसाधनेची आगळीवेगळी धाटणी, मांडणी सहजतेनं वाचकांच्या नजरेत भरू शकते.

मुक्तछंदाचा अल्पसा अपवाद, अनुवाद वगळता बहुतांशी विविध छंदात, वृत्तात, लयीत लिहिण्याची डबीरांची पिंडप्रकृती आहे. त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘व्हिस्कीत बर्फ वितळावा’ अन् ‘तसबीर’ या दोन वैशिष्टय़पूर्ण संग्रहांतून याचा प्रत्यय येत राहतो. त्यात विषय, आशयघन काव्यप्रकाराचे विविध विभाग करण्यात आले आहेत. त्यावरूनही त्यांच्या विविधांगी काव्यप्रतिभेची उत्कट अनुभूती येते. छंद वृत्तातील कितीही किचकट प्रकार असला तरी त्याला सहजसुलभ शैलीनं प्रासादिक रूप देण्यात डबीर कोणत्याही प्रकारची कसर बाकी नाही सोडत.

मदिरा, साकिया अन् इश्किया हे तरतरी वाढविणारे, झिंग आणणारे विषय ताकदीनं हाताळून डबीरांनी आपली स्वतंत्र गझलशैली निर्माण केलीय. हीच त्यांची खासीयत आहे. प्रेम, प्रणय, शृंगार, स्त्री-पुरुष संबंध यांसारखे विषय वारंवार येत असले तरी त्यात कुठेही बीभत्सपणा, एकसुरीपणा नाही येत. विषयाच्या अनुषंगानं त्यातील नेमका नाजूकपणा, नजाकत डबीरांनी जाणीवपूर्वक जपलीय.

गेल्या चाळीस वर्षांत डबीरांनी लिहिलेल्या विविध काव्य प्रकारांचा ‘व्हिस्कीत बर्फ वितळलावा’ अन् ‘तसबीर’ या संग्रहात अंतर्भाव करण्यात आला आहे. दंवात न्हाल्या फुलासारख्या रचना ’अजून यौवनात मी’चा उद्घोष करतच अवतरतात.

मी तुझ्या गाण्यात होतो शब्द होतो सूर होतो
तूच ती लावण्यगंगा की जिचा मी पूर होतो

अशा प्रकारची लावण्य सुरावट असलेल्या कितीतरी इष्किया रचना डबीरांनी केलेल्या आहेत. नवनिर्मितीच्या ध्यासानं शालेय जीवनातच त्यांच्या मनात कवितेचा गोडवा रुजला. धुळ्याहून नित्यनेमानं प्रकाशित होणाऱ्या खास कवितेला वाहिलेल्या ‘कवितारती’ मासिकाचे संपादक, कवितेचे जाणकार, चोखंदळ समीक्षक प्रा. पुरुषोत्तम पाटील सरांसारखे गुणी गुरू त्यांना प्रारंभीच्या काळात भेटले. त्यांनी अचूक मार्गदर्शनानं, प्रोत्साहनानं डबीरांच्या कवितेची वाट सुकर केली.

डबीर ज्या काळात मुंबईत डेरेदाखल झाले तो कवितेचा सुवर्णकाळ होता. रेडिओवरील भावगीतं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. कवी मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर या त्रयींच्या कविता गायनाच्या जाहीर कार्यक्रमांची मोठी रेलचेल होती. त्यांच्या छंदोबद्ध कविता अन् गाणी डबीरांच्या कानामनात रुंजी घालत असत. तिथून त्यांना खऱया अर्थानं कवितेची लयदार नस गवसली. सुरेश भटांच्या झंझावाती गझलांनीही त्यांना भुरळ घातली अन् ते गझलेच्या प्रेमात पडले. गेयता तर त्यांच्या कवितेत होतीच. मग त्यांनी भटांकडून गझलेचं शुद्ध तंत्र अन् आकृतिबंध अवगत करून घेतलं. ते गझला लिहू लागले.

श्वास हा, आयुष्य हे, सर्वस्वही वेडय़ापरी
गझल जे मागेल ते ते, देत जावे लागते

डबीरांच्या या शेराला भटसाहेबांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या गझललेखनाचे मनस्वी स्वागत केले. त्यानंतर डबीरांचे अनेक गझलसंग्रह वेगळेपणा घेऊन सिद्ध झाले. त्यांना भटांची प्रस्तावनाही लाभली. कोणत्याही गझलकारासाठी ही अपूर्वाईची गोष्ट आहे.
गझल नेहमीच गझलकाराची सत्त्वपरीक्षा पाहत आलीय. गझल जे मागेल ते ते गझलकाराला देता येते की नाही, त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे की नाही, हे गझल जोखत असते. यासाठी जो सर्वस्व उधळून गझलेची सोबत करतो, ती त्याच्यावर फिदा झाल्याशिवाय नाही राहत यावर डबीरांचा दृढ विश्वास आहे.

कधीतरी तुला जवळ करेल ही गझल
तुला मिठीत घेऊनी, हसेल ही गझल

इश्किया म्हणजेच प्रेमविषयक गझला. डबीरांनी त्या तितक्याच तरलतेनं, नजाकतीनं लिहिल्यात. प्रणय, शृंगार, विरह, हुरहूर, प्रतीक्षा अशा विविध भावछटा त्यातून समोर येतात.

मला कळलेच नाही की, कधी बाहूत शिरले मी
तुझ्या स्पर्शात सळसळले, तुझ्याशी बोलले तेव्हा
शृंगारसाज सारा उतरून ठेव रात्री
वेडय़ाखुळ्या पहाटे लावण्य पांघरू दे

संगीत नृत्यनाटिका हा काव्यप्रकार कवीच्या प्रतिभेला आव्हान देणारा असला तरी डबीरांनी हा सांगीतिक प्रकारही पूर्णतः सक्षमतेनं आविष्कृत केलाय्. अकरा संगीत नाटकांना त्यांनी गीतरचना केलीय. त्याला आशाताई खाडिलकर, आनंद मोडक, रघुनंदन पणशीकर, डॉ. राम पंडित, ज्ञानेश पेंढारकर या प्रतिभावान संगीतकाराचे संगीत लाभले आहे, तर त्यांच्या निरनिराळ्या गझल गीतांना जयवंत कुलकर्णी, यशवंत देव, रवींद्र साठे, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, कविता कृष्णमूर्ती, पद्मजा फेणाणी आदी मान्यवर गायक, गायिकांनी सुमधुर स्वर दिलाय.

डबीरांचा हात आजही लिहिता आहे. त्यांची काव्यप्रतिभा उत्तरोत्तर विस्तारतच आहे. आयुष्याच्या सांध्यपर्वातही त्यांच्यातील गझलेचा बहर ओसरलेला नाही. झरा आटलेला नाही. अनुवादासह कवितेतील छंदोबद्ध नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात डबीर आजमितीसही व्यग्र असतात.

आपली प्रतिक्रिया द्या