जाऊ शब्दांच्या गावा – पंचायत

>> साधना गोरे, [email protected] 

संख्या, हिशेब यांचा उपयोग गणितात होतो खरा, पण शेवटी गणित हा दैनंदिन भाषा वापरातला एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे काही संख्यायुक्त शब्द आपण रोजच्या भाषेत अगदी सहज वापरतो, उदा. ‘चौक’, ‘चौकट’ (‘चार’ संख्येचा निर्देश); ‘बारसं’ (‘बारा’ संख्येचा निर्देश); ‘पंचेंद्रिये’, ‘पंचक्रोशी’, ‘पंचतंत्र’ (‘पाच’ संख्येचा निर्देश), पण या शब्दांच्या अर्थाचा थोडा विचार केला त्यातल्या संख्या लक्षात यायला वेळ लागत नाही. या लेखात आपण ‘पाच’ या संख्येपासून तयार झालेले, पण त्यांचं अस्तित्व न जाणवणारे काही शब्द पाहणार आहोत.

संस्कृत ‘पञ्च’ किंवा मराठी ‘पाच’ हा शब्द कित्येक शब्दांच्या सुरुवातीला येऊन सामासिक शब्द तयार झाले आहेत. प्रत्येक शब्दात त्याचा अर्थ ‘पाच’ किंवा ‘पाचांचा समूह’ असा होतो. ‘पंचाक्षरी’ – पाच ठिकाणी मंत्राक्षरे, ‘पंचकन्या’ – अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी; ‘पंचकेणे’ – पाच व्यापारी जिन्नस – मिरी, मोहरी, जिरे, हिंग, खोबरे; ‘पंचपात्र’ – पाच धातूंच्या मिश्रणाने बनविलेले किंवा पाच बोटांनी उचलण्याचे पात्र; ‘पंचाळ’ – सोनार, सुतार, लोहार, कासार व पाथरवट या पाच जाती इत्यादी शब्द तयार झाले आहेत.

मराठीत तळहात व बोटे यांना एकत्रितपणे ‘पंजा’ म्हटलं जातं. तसंच पत्त्यातल्या पाच ठिपक्यांच्या पानालाही ‘पंजा’ म्हणतात. या ‘पंजा’ शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘पंच’ शब्दामध्ये असल्याचं काही कोशकारांनी सांगितलं आहे आणि त्याच्या मुळाशीसुद्धा ‘पाच बोटांचा समूह’ हाच भाव आहे. मात्र कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, “नुसत्या ‘पंच’पासून ‘पंजा’ शब्द निष्पन्न होणार नाही. त्याच्या शेवटी ‘क’ हा प्रत्यय हवा किंवा फार्सी भाषेतील ‘पन्जा’ हाच शब्द मराठी ‘पंजा’ या शब्दाचा मूळ असावा, हे अधिक सयुक्तिक आहे.’’ मात्र फार्सीतील ‘पन्ज’ शब्दाचा अर्थ ‘पाच’ असाच आहे. म्हणजे मराठीतील ‘पंजा’ शब्द संस्कृत ‘पंच’ किंवा फार्सा ‘पन्ज’ या कोणत्याही शब्दापासून आला असला तरी ‘पाच संख्या’ हा त्यातला भाव दोन्हीकडे सारखाच आहे.

मराठीत न्यायनिवाडा करणाऱयांना ‘पंच’ म्हटलं जातं. आपल्या जुन्या सामाजिक रूढीनुसार निवाडा करण्यास एक मनुष्य पुरा नसून चार-पाच जण लागत. ‘पाचामुखी परमेश्वर’ यासारखा शब्दप्रयोगही त्याचा निदर्शक आहे. पूर्वी सामाजिक, आर्थिक आणि न्याय अशा सगळ्या व्यवस्था गावातील पंचायती किंवा जात-पंचायतीच पाहत असत. आजच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत ही आपल्या लोकशाही शासन प्रणालीतील सर्वात लहान घटक आहे. यातील ‘पंचायत’ शब्द संस्कृत ‘पंचायतनम्’ या शब्दापासून आला. त्याचा अर्थ आहे, ‘पाच देवांचा समूह’. मात्र त्यातील एक देव प्रमुख असे. अशा मूर्तींना ‘पंच-आयतनम्’ म्हटलं जाई. आयतन म्हणजे आवास, स्थान किंवा पवित्र पीठ.

जुन्या रूढीप्रमाणे भांडणतंटे सोडविण्याला ‘पंचायत करणं’, ‘पंचायत बसणं’ म्हटलं जाई. त्यातून आजच्या मराठीत हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. ‘लुडबुड’, ‘चोंबडेपणा’, ‘उचापती करणं’ या अर्थानं मराठीत ‘पंचायती करणं’ म्हटलं जातं. ‘तुला नसत्या पंचायती कशाला पाहिजेत?’ या वाक्यातही तोच अर्थ आहे. ‘पाचामुखी परमेश्वर’ म्हटलं जातं, याउलट ‘पाचांची पाच बुद्धी’ अशीही म्हण आहे. म्हणजे पाच निरनिराळ्या प्रकृतीचे लोक जमले म्हणजे प्रत्येक जण निरनिराळ्या प्रकारची मतं देतो, त्यामुळे त्यांच्यात ऐक्य होणं कठीण! त्यातून अडचणीची स्थिती निर्माण होणं अगदीच स्वाभाविक आहे. या स्थितीला उद्देशून ‘पंचाईत’ म्हणजे अडचण, खोळंबा असाही अर्थ रूढ झाला. उदा. असल्या दुष्काळात गरीबाला अन्नपाण्याची पंचाईत झाली आहे.

लोकांनी निवडून दिलेला ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. आता यातल्या ‘पंच’ शब्दाचा अर्थ तर स्पष्ट झाला, पण ‘सर’ शब्दाचं मूळ काय? तर हा ‘सर’ शब्द फार्सातला आहे. फार्सात ‘सर’ म्हणजे डोकं. डोकं हा शरीराचा मुख्य भाग असतो. त्यावरून हा शब्द ‘मुख्य’, ‘श्रेष्ठ’, ‘नेता’ या अर्थानंही वापरला जाऊ लागला. पंचातला मुख्य तो सरपंच, नाईकांतला मुख्य तो सरनाईक किंवा देशमुखांतला मुख्य तो सरदेशमुख इत्यादी. ‘पाचावर धारण बसणे’ असा एक वाक्प्रचार आहे. पूर्वी फार महागाई झाली म्हणजे रुपयाला पाच शेर धान्य मिळे. त्यामुळे अर्थातच लोक हवालदिल होत. यावरून खूप घाबरणं, भीतीनं गांगरून जाणं या अर्थानं हा वाक्प्रचार वापरला जातो. अशा शब्दप्रयोगांच्या निर्मितीच्या वेळची स्थिती कायम राहणार नसते हे खरं! पण सध्याचा महागाईचा उच्चांक पाहता आपली कितीवर धारण बसायला पाहिजे?