
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठी दालन मध्यवर्ती हिरवळीवर उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे याची ओळख व माहिती करुन देणारे असे हे वैशिष्ट्यपूर्ण दालन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने उभारण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या मराठीप्रेमी लोकांनी अभिजात मराठीसाठी या दालनास भेट देत मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी उभे राहावे असा आमचा प्रयत्न आहे.
या निमित्ताने “ शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे ” या लघुपटाची निर्मिती आमच्या राज्य मराठी विकास संस्थेने केली आहे. यामध्ये एक अभिरूप न्यायालय अशी संकल्पना करुन वादविवाद आणि संवाद यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभ पध्दतीने मराठी भाषा विभागाचे म्हणणे मांडण्यात येणार आहे. या लघुपटाची पटकथा प्रा.हरी नरके यांनी लिहिली आहे. प्रा. रंगनाथ पठारे, अध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या लघुपटाची निर्मिती श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय प्रा.लि. यांनी केली आहे.
अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या प्राचीनत्वाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा अधिक उपलब्ध आणि अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, 19 व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा 2000 वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासादरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ, निवडक गाथांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन असणारे दालन उभारण्यात आले आहे. मराठीतील प्राचिन व दुर्मिळ ग्रंथ, साहित्य सामुग्री “टचस्क्रिन वर मराठीप्रेमींना पाहावयास मिळणार आहे. याशिवाय शासनाने प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांच्या, पेनड्राईव्ह मधील विश्वकोष विक्रीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

























































