प्रभासचा ‘साहो’ 100 कोटींच्या क्लबमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट समीक्षकांनी झोडपून काढला असला तरी प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘साहो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे.

‘बाहुबली’च्या छप्परफाड यशानंतरचा प्रभासचा पहिला सिनेमा असल्याने ‘साहो’बद्दल प्रचंड उत्सुकता होती. गेल्या वर्षभरापासूनच विविध माध्यमांतून या चित्रपटाची प्रसिद्धी केली जात होती. तब्बल 350 कोटी रुपये खर्चून बनवलेला हा सिनेमा 30 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये झळकला. मात्र, कथेचा मागमूस नसलेल्या या सिनेमाला समीक्षकांनी झोडपून काढले. असे असले तरी चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

कृपया चित्रपट पुन्हा एकदा बघा, दिग्दर्शकाचे भावनिक आवाहन

‘साहो’ चित्रपटाला समीक्षकांनी झोडपल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत यांनी प्रभासच्या चाहत्यांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची विनंती केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून हे आवाहन केले आहे. ‘मी वयाच्या 17व्या वर्षी माझा पहिला लघुपट तयार केला होता. अगदी प्रतिकूल परिस्थितीत तयार केलेल्या या लघुपटातील 90 टक्के काम मी स्वतःच केले होते. दरम्यान मला माझ्या कुटुंबाने आर्थिक व मानसिक आधार दिला. मी माझ्या चुकांची पुनरावृत्ती न करता त्यातून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच मला ‘साहो’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. ‘साहो’ चित्रपटामध्येही मी काही चुका केल्या असतील, परंतु पुढल्या वेळेस त्या होणार नाही, याची काळजी मी घेईन. साहो पाहिलेल्या समस्त प्रेक्षकांचे आभार. कृपया त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाचा आनंद घ्यावा ही विनंती.’ अशा शब्दांत त्याने प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याचे भावनिक आवाहन केले आहे.