
पश्चिम घाटातील वाघांची संख्या वाढणार असून, ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधून तीन नर आणि पाच मादी अशा आठ वाघांचे स्थलांतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये केले जाणार आहे. यासाठी अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामाना बदल मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सह्याद्रीच्या खोऱयात वाघांची डरकाळी घुमणार आहे.
देशातील पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी एक असलेल्या सह्याद्री प्रकल्पात सध्या एकही वाघ नसल्याची माहिती 2022च्या व्याघ्रगणनेत समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने ऑक्टोबर 2023 मध्ये वाघांचे सह्याद्री प्रकल्पात स्थलांतर करण्याची शिफारस केली होती. उत्तर पश्चिम घाटात प्रजनन करणारे वाघ नसल्याने ताडोबा-अंधारी आणि पेंच प्रकल्पातील नर आणि मादी वाघांचे स्थलांतर करावे. वाघांच्या स्थलांतरामुळे पश्चिम घाटातील दाट जंगल, नद्यांचे पाणी प्रवाह क्षेत्र (कोयना आणि वार्णा नद्या) संरक्षित राहील. सह्याद्री आणि गोवा-कर्नाटकातील दक्षिणेकडील वाघांचा वावर वाढेल, असेही या समितीने म्हटले होते. वन्यजीव संस्थान आणि वन विभागाच्या अभ्यासानुसार सह्याद्री प्रकल्पात 20 पेक्षा जास्त वाघ राहू शकतात.
वाघांचे पहिल्यांदाच स्थलांतर होणार
पश्चिम घाटातील सह्याद्री हे महत्त्वाचे खोरे आहे. येथे मोठी नैसर्गिक संपदा आहे. तसेच गेल्या काही वर्षांत सह्याद्रीच्या परिसरात रानगवा आणि मानव यांच्यात संघर्ष होत आहे. येथे रानगव्यांची संख्या वाढली आहे आणि वाघाचे खाद्य रानगवा आहे. वाघ आल्यास रानगव्यांच्या संख्येचा समतोल साधला जाईल, असाही अंदाज आहे.