साई दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारकच

कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेले शिर्डी येथील साई मंदिर भक्तांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिर्डी येथे भक्तांची गर्दी वाढत चालली असून दर्शनासाठी भक्तांना ऑनलाइन बुकिंग बंधनकारक करण्यात आल्याचे संस्थानाकडून पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, भक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुटय़ांच्या दिवशी पास वितरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे संस्थानने जाहीर केले आहे.

कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शिर्डी येथील साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र ’पुनश्च हरिओम’ म्हणत 16 नोव्हेंबरपासून शिर्डी येथील साईमंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

सध्या मर्यादित भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांत या ठिकाणी भक्तांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीकोनातून संस्थानने पुन्हा एकदा भक्तांना आवाहन करताना दर्शनासाठी सशुल्क आणि निशुल्क ऑनलाईन बुकिंग आवश्यक असल्याचे जाहीर केले आहे.

आरक्षित पास नसल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संस्थानने जाहीर केले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता शिर्डी येथील पास वितरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पालख्या आणू नका

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध भागांतून विशेष करून मुंबईहून पायी शिर्डी येथे पालखी घेऊन जाणाऱया भक्तांची संख्या वाढत चालली आहे.

यंदाही अनेक मंडळांनी पदयात्रेचे आयोजन केले असून कोविडमुळे आलेल्या निर्बंधामुळे संस्थांनी यंदा मंडळांनी पालख्या आणू नये, असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या