पय्याडे चषक क्रिकेट- अनिर्णित लढतीत लेगस्पिनर साई सनिलला 8 विकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया 16 वर्षांखालील मुलांच्या पय्याडे चषक क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघ विरुद्ध सुनील गावस्कर संघांतील दोनदिवसीय लढत अखेर अनिर्णित राहिली. मात्र या लढतीत जबर छाप पडली ती गावसकर संघाचा लेगस्पिनर  साई सनिलने. त्याने या लढतीत अफलातून फिरकी मारा करीत 8 विकेट मिळवल्या. कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखान्यावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साईने पहिल्या डावात तेंडुलकर संघाच्या 6 फलंदाजांना तर दुसऱया डावात 2 फलंदाजांना बाद केले. साईच्या या कामगिरीबद्दल त्याला लढतीचा ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

पय्याडे चषकासाठीच्या या लढतीत नाणेफेक जिंकून सचिन तेंडुलकर संघाने प्रथम फलंदाजी घेतली. त्यांचा पहिला डाव 63.5 षटकांत 243 धावांवर आटोपला. या डावात साईने 20 षटकांत 57 धावा देत 6 विकेट घेतल्या. त्यानंतर सुनील गावसकर संघाने 90 षटकांत 8 बाद 284 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. रुद्र साळुंकेने 216 चेंडूंत 14 चौकार आणि 2 षटकारांसह 119 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर तेंडुलकर संघाच्या दुसऱया डावातही आपल्या प्रभावी लेगस्पिन माऱयाने साईने 97 धावांत 2 फलंदाज बाद केले. गावसकर संघाला दुसऱया डावात खेळायला न मिळाल्याने ही लढत अनिर्णित अवस्थेत संपली. पण गावसकर संघाच्या साई सनिल आणि शतकवीर रुद्र साळुंकेने आपल्या खेळाने उपस्थितांची मने जिंकली.