खेळाडूंसाठी आहारतज्ञ, शेफ नेमणार; ‘साई’ची फिटनेससाठी विशेष योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाने (साई) देशभरातील आपल्या केंद्रातील खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी विशेष योजना तयार केली आहे. सराव करणार्‍या खेळाडूंना त्याच्या गरजेनुसार पोषक आहार मिळण्यासाठी व्यावसायिक आहारतज्ञ व चांगले शेफ नेमण्यात येणार आहेत. स्पोर्टस् ऍथॉरिटी ऑफ इंडियाने ही विशेष योजना राबविण्याचा निर्धार केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर हिंदुस्थानला अधिकाधिक पदके मिळण्यासाठी त्या दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी ‘साई’ने कंबर कसायला सुरुवात केली आहे. प्रत्येक खेळाडूला त्याच्या वयानुसार योग्य तो कसा आहार मिळावा त्यासाठी आहारतज्ञ व शेफ ठेवण्यात येणार आहेत. सराव शिबिरातील प्रशिक्षक व स्पोर्टस् सायन्स विशेषतज्ञ यांच्या देखरेखीखाली या नव्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेफ आणि आहारतज्ञांचे मानधनही एक लाख रुपयांपर्यंत असणार आहे. खेळाडूंना पोषक आहार मिळत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी आहारतज्ञाची असेल. शिवाय केंद्रातील मुख्य अधिकारीही वेळोवेळी खेळाडूंच्या या स्वयपांकघरावर लक्ष ठेवून असेल. आहारतज्ञ व प्रशिक्षक हे प्रत्येक आठवड्याला खेळाडूंच्या डाएटचा आढावा घेऊन पुढील योजना तयार करतील.

या फिटनेसाठीच्या विशेष योजनेची अंमलबजावणी दिल्ली, पतियाळा, बंगळुरू, तिरुवनंतपुरम, कोलकाता, भोपाळ, गांधीनगर, लखनौ, इंफाळ, गुवाहाटी, मुंबई, सोनीपत, रोहतक आदी ‘साई’च्या सेंटरवर होणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी ‘साई’ने आहारतज्ञ, सहायक आहारतज्ञ, शेफ, सहायक शेफ आणि खानावळ व्यवस्थापक आदी पदांसाठी अर्जही मागितले आहेत. या वर्षी 15 सप्टेंबरपर्यंत ही पदे भरली जातील अशी अपेक्षा आहे.