
सामना ऑनलाईन । कोपनहेगेन
सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱया हिंदुस्थानच्या सायना नेहवालला फायनलमध्ये चिनी तैपेईच्या ताई झू यिंगकडून 13-21, 21-13, 6-21असा पराभव पत्करावा लागला. जागतिक अग्रमानांकित यिंगचा हा सायनावरील सलग 11 वा विजय आहे.सायनाने यापूर्वी 21 मे 2012 ला आपले पहिले आणि एकमेव डेन्मार्क ओपन विजेतेपद पटकावले होते. यंदा त्याचीच पुनरावृत्ती तिच्याकडून होईल असे वाटत असताना यिंगने पुन्हा सायनाचे स्वप्न उधळले.
जागतिक अग्रमानांकित ताई झू यिंगने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पहिल्या गेमपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले होते. यिंगने पहिला गेम 15 मिनिटांत 21-13 असा जिंकत सायनावर दडपण वाढवले. दुसऱया गेममधे सायनाने आपल्या बहारदार खेळणे यिंगला जोरदार झुंज देत पुनरागमन साजरे केले आणि हा गेम 21-13 असा जिंकत लढतीत चुरस आणली. पण तिसऱया गेममधे मात्र सायना पुन्हा मागे पडली. या गेमच्या मध्यंतरालाच ताईने 11-2 अशी मोठी आघाडी घेतली. या पिछाडीनंतर सायना स्वतःला सावरू शकली नाही आणि यिंगने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करीत 21-6 अशा सहज विजयासह डेन्मार्क ओपनचे विजेतेपद पटकावले.
सायनावर यिंगचा वरचष्मा
आतापर्यंत ताई झू यिंग आणि सायना नेहवाल यांच्या लढतीत यिंगने नेहमी बाजी मारली आहे. नुकत्याच जकार्ता येथील आशियाई खेळांमध्येही यिंगने सायनाला पराभूत केले होते. 2013 साली झालेल्या स्विस ओपन स्पर्धेत सायनाने यिंगला पराभवाचे पाणी पाजले होते. त्यानंतर सलग 11 लढतींत सायना नेहवाल यिंगविरोधात एकदाही जिंकू शकलेली नाही.
summary- saina nehwal lost denmark open final





























































