सायना जिंकली, श्रीकांत हरला; डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानला शनिवारी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे शटलक्वीन सायना नेहवाल हिने महिला एकेरीत अगदी रुबाबात अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसरीकडे स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला उपांत्य फेरीतच गारद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.

सायना नेहवालने उपांत्य फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया तुनझुंग हिला 21-11, 21-12 अशा फरकाने अगदी सहज हरवले आणि जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केले. हिंदुस्थानच्या अनुभवी बॅडमिंटनपटूने अवघ्या 30 मिनिटांमध्ये ही लढत जिंकली. सायना नेहवालने 2012 साली डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकली होती. आता तिच्यासमोर आशियाई चॅम्पियन तेई झु यिंग हिचे आव्हान असणार आहे. तेई झु यिंग हिने उपांत्य फेरीत ही बिंगजिओ हिला 21-14, 21-12 असे पराभूत केले.

वर्ल्ड चॅम्पियन केंटो मोमोटा याने किदाम्बी श्रीकांतला 21-16, 21-12 असे हरवत फायनलमध्ये प्रवेश केला. दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतीत जपानच्या खेळाडूचे वर्चस्व दिसून आले आहे. त्याने नऊ लढती जिंकल्या असून हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांत याने फक्त तीन वेळा बाजी मारली आहे.

summary- saina nehwal won in denmark open badminton