।।साईबाबा।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

शिर्डीचे अध्यक्ष आणि प्रथितयश उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी ‘साईसेवा’ हा ग्रंथ लिहिला आहे. साईबाबा संस्थानचे विश्वस्त या नात्याने त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचा परिचय व्हावा तसेच हे कार्य करत असताना त्यांना जे मुद्दे शिकायला मिळाले ते त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत.

देशविदेशातील कोटय़वधी भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे शिर्डी संस्थान. हे संस्थान नावारूपाला आले ते श्री साईबाबांमुळे. त्यांनी शिर्डीत वास्तव्य केल्यामुळे तेथे झालेला बदल हे त्यांच्यातील दैवी सामर्थ्याचे जिवंत उदाहरण. सध्याचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे अध्यक्ष आणि प्रथितयश उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी ‘साईसेवा’ हा ग्रंथ लिहिला आहे. साईबाबा संस्थानचे विश्वस्त या नात्याने त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचा परिचय व्हावा तसेच हे कार्य करत असताना त्यांना जे मुद्दे शिकायला मिळाले ते त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत.

डॉ. सुरेश हावरे याबाबत म्हणतात की, ‘शिर्डीने खूप काही शिकवलं. अनेक आंदोलने, मोर्चे, निषेधसभा, शिष्टमंडळे यांना सामोरं जायचं चांगलंच प्रशिक्षण मिळालं. मध्यंतरी माझ्या गाडीची तोडफोड झाली. माझी अत्यंयात्रा काढण्यात आली, मात्र माझ्या मनात कुणाबद्दलही राग-द्वेष नाही. गैरप्रकार बंद करण्यात संपूर्ण यश आलं असं नाही, पण बऱयाच प्रमाणात ते बंद झाले, नवं महाविद्यालय सुरू झालं, आकाशवाणीचं शिर्डी एफएम केंद्र सुरू झालं, विमानतळाचं उद्घाटन झालं याचा खूप आनंद आहे.’

लोकांच्या साईबाबांप्रति असलेल्या भक्तीला सेवेची जोड द्यावी आणि सेवेच्या माध्यमातून काम उभं करावं. या हेतूने त्यांनी संस्थानच्या विश्वस्तपदाची सूत्रे हाती घेतली. लीला आणि सेवा हे बाबांच्या जीवनाचे दोन ठळक भाग आहेत. बाबांनी भक्तोद्धारासाठी अनेक लीला केल्या तेवढय़ाच प्रमाणात सेवाही केली. मुख्य म्हणजे समाजहितासाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र दिला. बाबाचं काम करणं म्हणजे गोरगरीबांची सेवा करणं हा धागा पकडून हावरे यांनी कामाला सुरुवात केली. भक्तांना बाबांचं दर्शन सुलभतेनं दर्शन व्हावं यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करणं, रुग्णसेवेला बाबांच्या जीवनात महत्त्वाचं स्थान होतं. म्हणून संस्थानतर्फे दोन अद्ययावत रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे, प्रसादरूपाने मोफत भोजन दररोज 12 तास उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तसेच संस्थानतर्फे दोन विद्यालये चालवली जातात. ‘रक्तदान’, ‘साईसेवक’,‘साई अगरबत्ती’ आणि ‘स्वच्छ शिर्डी’ विशेष म्हणजे भक्तांकडून समाधीवर 2 ते 3 टन फुलं वाहिली जातात. या फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याचा यशस्वी प्रयोगही करण्यात आला अशा अनेक नवनवीन योजना कशा राबवल्या गेल्या याविषयी माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.

उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल शिर्डी संस्थानला शासनाकडून आयएसओ प्रमाणपत्र मिळालं आहे. यामुळे मंदिरातील पूजा आणि अन्य विधींचे प्रमाणिकरण झालं आहे. याशिवाय भाविकांची भक्ती हा केवळ कमाईचा विषय होता. रांगेतल्या भाविकांना वाटेल त्या भावाने पाणी विकलं जात होतं. यावर उपाय म्हणून भक्तांना रांगेतच शुद्ध आणि थंड पाणी मोफत देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. भक्तांची गैरसोय टाळावी यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याविषयीची माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. त्यांनी राबवलेल्या योजनांना ‘साईसेवक’ योजना असे म्हटले जाते. याकरिता केलेल्या अभिनव गोष्टींचा प्रयोग, सेवेकऱयांना सेवेबद्दल मिळणारे प्रमाणपत्र, साईसेवक म्हणून त्यांनी घेतलेली शपथ हे सर्वच वाचताना सेवा म्हणून एखादे कर्म निरपेक्षपणे केले की त्याचे भक्तीत कसे रूपांतर होते हे शिकायला मिळते.

साईमंदिराचं प्रसादालय हे आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय आहे. शिर्डीचं स्वयंपाकघर दररोज पहाटे 2 वाजता कामाची सुरुवात करतं आणि रात्री 11 वाजता ते थांबतं. तेही फक्त साफसफाईसाठी. विशेष म्हणजे 25 हजार पोळ्या दर एक तासाला बनवणारे मशीन, सोलवर चालणारे स्वयंपाकघर अशी वाखाणण्याजोगे वैशिष्टय़ येथील स्वयंपाकघराचे आहे. अशा प्रकारे राज्यात अव्वल बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक हृद्य उपक्रम येथे राबवले जात आहेत. रुग्णाविषयी साईबाबांना प्रचंड आस्था होती. या भावनेतूनच रुग्णांकरिता अनेक योजना आज शिर्डी संस्थानतर्फे मोफत राबवल्या जात आहेत. येथे रुग्णांना अनेक बिलांवर सवलतीही दिल्या जातात.

दर्शनासाठी येणाऱया भक्तांना साईबाबांचं चरित्र आणि त्यांच्या लीला सहजपणे समजल्या पाहिजेत त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाची ओळखही व्हायला हवी याकरिता साई नॉलेज पार्क हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे श्रद्धास्थान जागतिक नकाशावर येण्यासाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लेखक डॉ. सुरेश हावरे मेहनत घेत आहेत. भक्ती ही देव किंवा संत यांच्याविषयी असलेल्या आध्यात्मिक भावाशी निगडीत असली तरीही अत्याधुनिक विज्ञानाशी घातलेली सांगड घालून केलेले अभिनव प्रयोगांची ओळख ‘साईसेवा’ या पुस्तकामुळे होते. याशिवाय शिर्डीतील साई पालखी सोहळा, मान्यवरांच्या भेटी, जगभरातील भाविकांनी भेट देऊनही हे शहर स्वच्छतेबाबत कसे जागरुक आहे याचीही माहिती मिळते.
बऱयाच जणांना साईबाबा, साईमंदिर, साईदर्शन, तीर्थप्रसाद यापलीकडे फारशी माहिती नाही. म्हणून या पुस्तकाद्वारे नव्या योजना आणि उपक्रमांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचून साईबाबा संस्थानच्या कार्याची ओळख व्हायला मदत होईल. धार्मिक स्थळांचा कायापालट करण्यासाठी विविध प्रकल्प राबवणाऱया सेवेकऱयांना हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे आहे.