
पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळ या धावपटूने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये (४२.१९५ कि. मी.) सहभागी झाली आणि जिंकली देखील. तिच्या या यशाने चिपळूण तालुक्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव झळकले आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हटले, की आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, महिलांच्या मॅरेथॉनमध्ये या वर्चस्वाला रविवारी धक्का बसला. महाराष्ट्राच्याच चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. सणस क्रीडांगणापासून रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. गेल्या वर्षी साक्षीने पुणे मॅरेथॉनमधील अर्धमॅरेथॉन जिंकली होती. या वेळी ती जिद्दीने ४२.१९५ किमी अंतराच्या शर्यतीत सहभागी झाली.
यासाठी तिने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून साताऱ्यात कसून सराव केला होता. या मेहनतीचे रविवार ७ डिसेंबर रोजी चीज झाले. जिंकण्याच्या जिद्दीनेच साक्षी मॅरेथॉनसाठी आली होती. मात्र, आफ्रिकन धावपटूंचा सराव पाहून तिच्या मनात भीतीही होती. अर्थात, काही झाले तरी बाजी मारायचीच, याची खूणगाठच जणू तिने मनात बांधली होती. त्यामुळे शर्यंत सुरू झाल्यावर ती आघाडीच्या जथ्यातच होती. मात्र, जसजशी शर्यत अखेरच्या टप्प्याकडे जाऊ लागली, तसा जथ्याही विखुरला. अखेरच्या टप्प्यात साक्षी आणि इथिओपियाची एडाओ मेसेरे तुलू यांच्यात चुरस होती. त्यापाठोपाठ, इथिओपियाचीच वारे बोंटू डेमिसे होती. अखेरची तीन किलोमीटर राहिले असताना साक्षीने गिअर बदलले. तिने पूर्ण जोर लावला आणि पाहता पाहता या शर्यतीत बाजीही मारली. साक्षीने २ तास ३९ मिनिटे ‘व ३७ सेकंद अशी वेळ नोंदवली.
विशेष म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमधील हिंदुस्थानी धावपटूने नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ ठरली. इथिओपियाची एडाओ मेसेरेट तुलू २ तास ४० मिनिटे व ५६ सेकंद वेळ नोंदवून दुसऱ्या, तर बोंटू डेमिसे २ तास ५० मि. ४६ सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिली. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली आणि तिने दैदिप्यमान यश मिळवले.


























































