
सध्याच्या काळात व्हॉट्सऍप हा माणसाच्या जीवनातला महत्त्वाचा भाग बनला आहे. व्हॉट्सऍपच्या चांगले आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. अनेकांसाठी व्यवसायाची संधी व्हॉट्सऍप उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या मेघा बाफना यांनीही या प्लॅटफॉर्मचा वापर करून आश्चर्यकारक काम केलेय. मेघा यांनी सॅलेड बनवण्याचे आपले कौशल्य पणाला लावून व्हॉट्सऍपच्या माध्यमातून व्यवसाय उभा केला. आणि तोही अवघ्या 3500 रुपयांत! आज मेघा या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे.
मेघा रिअल इस्टेट कंपनीत काम करतात. त्यांनी सॅलेड बनवण्याच्या आवडीला 2017 मध्ये व्यवसायाचे रुप दिले. सुरुवातीला ‘पुणे लेडीज’ या फेसबुक पेजवरून त्यांनी सॅलेडची प्रसिद्धी केली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर व्हॉट्सऍपवरील महिला ग्रुपमध्ये त्यांनी सॅलेड व्यवसायाची माहिती शेअर केली. तिथूनच त्यांना जास्त ऑर्डर मिळू लागल्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्कास वाढला. ‘कीप गुड शेप’ असे त्यांच्या स्टार्टअपचे नाव आहे. सॅलेडची चव आणि दर्जा यामुळे माऊथ पब्लिसिटीने त्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत.
दिवसाला 350 ऑर्डर
मेघा बाफना यांना दिवसाला 350 ते 400 इतक्या सॅलेडच्या आर्डर व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून येतात. ‘कीप गुड शेप’ स्टार्टअपमध्ये 24 वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड उपलब्ध करून देतात. हे अतिशय हेल्दी सॅलेड आहेत. या रेसिपी त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्यांच्या हातच्या क्विनियो बोरिटो बाऊल, मिओनिज रशियन सॅलेड, पाणीपुरी सॅलेड, कॉर्न सॅलेड, मेक्सिकन सॅलेड यांना विशेष मागणी आहे. येत्या काळात फ्रँचायसी देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
घर आणि नोकरी सांभाळून…
मेघा सांगतात, जेव्हा काम सुरू केले तेव्हा हा व्यवसाय एकटीने मी सांभाळत होते. भाज्या विकत घेण्यापासून ते सॅलेड पोहचविण्यापर्यंत सारं एकटीने करायचे. नंतर वाढत्या ऑर्डर लक्षात घेऊन डिलिव्हरी बॉय ठेवले. तसेच सॅलड कापण्यासाठी काही महिला देखील ठेवल्या. आजही मी नोकरी सांभाळून आणि कुटुंबाला पूर्ण वेळ देऊन सॅलेडचा व्यवसाय करत आहे.


























































