
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील एसटी महामंडळाच्या 86 हजारांहून अधिक कर्मचाऱयांचा पगार रखडला आहे. एसटी कर्मचाऱयांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला देऊ, असे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी गेल्या वर्षी दिले होते. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत पगाराचा ‘जीआर’ही काढण्यात आला नाही. त्यामुळे ‘सात’चा मुहूर्त चुकण्याबरोबर जीआर जारी न केल्यामुळे पगार नेमका होणार कधी? असा प्रश्न एसटी कर्मचाऱयांना पडला आहे.
गेल्या वर्षी थकीत देयकांच्या प्रश्नावर एसटी कर्मचाऱयांच्या कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी सरकारने विविध घोषणांची खैरात केली. एसटी कर्मचाऱयांचा पगार 7 तारखेलाच होईल, असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले, मात्र त्यानंतर काही महिने पगार देण्यासाठी 7 तारखेची वेळ पाळण्यात आली. अनेकदा 7 तारीख उलटल्यानंतरच पगार दिला. तीच अनियमितता नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिसून आल्याने एसटी कर्मचारी-अधिकाऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एसटी कामगारांना पगारासाठी दर महिन्याला सरकारच्या जीआरची वाट बघावी लागते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा ‘जीआर’ न आल्याने 7 तारखेला मिळणारा पगार रखडला आहे. महिनाभर अहोरात्र कष्ट करणाऱया एसटी कामगारांनाच पगाराची प्रतीक्षा करावी लागते हे दुर्दैव आहे.
z हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना
































































