अनुज थापनच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला सोमवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. अनुजच्या मृत्यूशी सलमानचा कुठलाही संबंध दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकेत प्रतिवादी म्हणून असलेले सलमानचे नाव वगळण्याचे निर्देश याचिकाकर्त्या रिटा देवी यांना दिले.
14 एप्रिल रोजी वांद्रेतील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. गोळ्या झाडणाऱयांना शस्त्र पुरवल्याप्रकरणी अनुज थापनला पोलिसांनी अटक केली होती. त्याने पोलीस कोठडीत असताना गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात हलवले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुजला कोठडीत पोलिसांनी मारहाण केली होती. याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करीत अनुजची आई रिटा देवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने रिटा देवी यांना याचिकेतील सलमान खानचे नाव वगळण्याचे निर्देश दिले. याचिकेत सलमानचे नाव जोडून तुम्ही तुमच्या मूळ मुद्दय़ाला कमी महत्त्व देत असल्याचे दिसतेय, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.
दंडाधिकारी चौकशी सुरू; सरकारची माहिती
अनुजच्या मृत्यूप्रकरणी दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यात आली असून सीआयडी तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी दिली. यावेळी रिटा देवी यांना दंडाधिकाऱयांपुढे जबाब नोंदवण्यासाठी बजावलेले समन्स उशिरा मिळाल्याचे अॅड. निशांत राणा यांनी सांगितले. त्याची दखल खंडपीठाने घेतली व दंडाधिकाऱयांनी नव्याने समन्स जारी करावे, अशी सूचना खंडपीठाने केली. याबाबत सहा आठवडय़ांनी पुढील सुनावणी होणार आहे.