
सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर काही क्षुल्लक चुकांमुळे मनस्ताप होणं, ही तशी सामान्य बाब आहे. पण, अशाच एका चुकीसाठी सलूनला चक्क 2 कोटींचा दंड भरावा लागणार आहे.
National Consumer Disputes Redressal Commission ने हा दंड ठोठावला आहे. नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रांगणात हे सलोन आहे. या प्रकरणातील तक्रारदार तरुणी ही एप्रिल 2018मध्ये त्यांच्याकडे केस कापण्यासाठी गेली होती.
ही तरुणी व्यवसायाने मॉडेल आहे. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा त्या सलोनमध्ये तिची नेहमीची हेअर स्टायलिस्ट गैरहजर होती. त्यामुळे तिला दुसरी स्टायलिस्ट पुरवण्यात आली. तिला तरुणीने केस कापण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तरुणीचे केस लांब होते. त्यामुळे तिला फक्त ते खालच्या बाजूने चार इंच कापून हवे होते तसेच समोरच्या बाजूला लांब बटा हव्या होत्या.
या तरुणीला नंबरचा चष्मा आहे. तो तिने केस कापत असताना काढून ठेवला होता. तसंच केस कापणाऱ्या स्टायलिस्टने तिला सतत मान खाली घालून राहायला सांगितलं होतं. साध्याशा हेअर कटसाठी या स्टायलिस्टने तासभर वेळ घेतला. पण, जेव्हा हेअर कट पूर्ण झाला तेव्हा तो पाहून तक्रारदार तरुणीला धक्काच बसला.
या हेअर स्टायलिस्टने तिचे केस अवघे चार इंच इतकेच ठेवले होते. लंडन हेअर कट नावाची हेअर स्टाईल असल्याचा दावाही तिने केला होता. या स्टाईलनंतर तरुणीकडून लांब केसांसाठी मिळालेल्या मॉडेलिंगच्या ऑफर रद्द झाल्या आणि तिला व्यावसायिक नुकसान झालं.
त्यामुळे या तरुणीने सलोनविरोधात ग्राहक समितीत तक्रार केली. त्या प्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवताना अध्यक्ष म्हणाले की, महिला आपल्या केसांप्रति जागरुक आणि भावनिक पातळीवर जोडलेल्या असतात. केस नीटनेटके ठेवण्यासाठी त्या भरभक्कम किंमत मोजतात. या प्रकरणातील तक्रारदार या मॉडेल आहेत. त्यांच्याबाबत झालेल्या या चुकीमुळे त्यांच्याकडून ऑफर काढून घेण्यात आल्या आणि त्यांचं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे या प्रकरणी सलोनला 2 कोटींचा दंड नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश ग्राहक समितीने दिला आहे.



























































