सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणे साजरे केले पाहिजे. त्यामुळे दरवर्षी दि. 6 जून रोजी साजरा करण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करण्यात यावा अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे. सहा जून रोजी करण्यात येणा-या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा जावई शोध त्यांनी या निमित्ताने लावला आहे.कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना भिडेंनी ही मागणी केली आहे.यावेळी रायगड वरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे ही त्यांनी समर्थन केले आहे.

दरम्यान अनेक इतिहास संशोधक तसेच शिवप्रेमी संघटना आणि संस्थांच्या एकमताने गेल्या एक तपाहून अधिक काळ दि.६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.हा सोहळा एकीकडे लोकोत्सव बनलेला असतानाच, संभाजी भिडे यांनी केलेल्या या विरोधामुळे संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गेल्या काही वर्षापासून लोकोत्सव बनलेला हा सहा जून रोजीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे.पण हा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरुपी बरखास्त करायला हवा.हा सोहळा तारखेनुसार (६ जून) रोजी न करता,तिथीनुसार करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणेच पार पडले पाहिजेत.आपण अजूनही ब्रिटिशांच्या पद्धतीने तारखेनुसार उत्सव साजरा करतो.हे उत्सव तिथीप्रमाणे तसेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा सोहळा झाला पाहिजे असे भिडे म्हणाले.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचेही भिडेंचे समर्थन

गेल्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या शेजारी असलेल्या एका समाधीवरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाला विरोध केला होता .अनेक इतिहास संशोधकांचे दाखले तसेच ऐतिहासिक संदर्भ देत, “वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही,” त्यामुळे हा पुतळा हटवण्याची मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे . संभाजी ब्रिगेडनेही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे . पण यासंदर्भातही भिडे यांनी रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधीचे थेट समर्थन केले आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवू नये,या कुत्र्याचं राजकारण करू नये, अशी भुमिका स्पष्ट करत, वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात,ते कोणत्या उंचीचे आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही भिडे यांनी यावेळी केली.