
या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनाच हवी. हे माझे वैयक्तिक मत नसून राष्ट्रीय मत आहे, असे ठाम प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे एका चौकाचे नामकरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांना जिकंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तसेच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांची आशा-आकांक्षा होती की, संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी, असे ते म्हणाले.
पद, पैसा, स्थान, मोठेपण हे क्षुल्लक आहे. आपल्याला हा संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणायचा आहे. या देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे हे लक्षात ठेवून काम करूया. हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकते, असा विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला.































































