
सामना ऑनलाईन । पंचकुला
हरयाणातील पानिपतनजीक ‘समझौता एक्सप्रेस’मध्ये 18 फेब्रुवारी 2007 रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा 20 मार्चला दिलेल्या निकालाची कागदपत्रे न्यायमूर्ती जगदीपसिंह यांनी गुरुवारी उघड केली. नृशंस हिंसाचाराच्या या प्रकरणात स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान, राजिंदर चौधरी हे चौघे केवळ पुराव्याच्या अभावामुळेच सुटलेत, असे न्यायमूर्ती सिंह यांनी सांगितले. ते ‘एनआयए’च्या न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.
विश्वसनीय आणि स्वीकारार्ह साक्षीपुराव्यांच्या अभावामुळे या प्रकरणात कोणालाही गुन्हेगार ठरवता आले नाही. खटल्यातील साक्षींमध्ये सातत्याचाही अभाव होता. त्यामुळे दहशतवादी कृत्याचा हा खटला अनिर्णित राहिला असे सांगून न्यायमूर्ती सिंह यांनी ‘आपण अत्यंत दुःखी अंतःकरणाने हा खटला समाप्त केला आहे,’ असे विस्तृत निकालात म्हटले आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. कारण जगातला कोणताही धर्म हिंसेचा संदेश देत नाही, असे न्यायमूर्तींनी नमूद केले.

























































