समृद्धी महामार्ग उद्घाटन झालेले नसताना केला खुला, मिंधे गटाचा गर्दी जमवण्यासाठी आटापिटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सगळय़ाच गोष्टी बेकायदा करण्यात पटाईत असलेल्या शिंदे गटाच्या बीकेसीवर होणाऱया मेळाव्याचा मार्गही ‘समृद्धी’वरूनच गेला असून, तोही बेकायदा! समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झालेले नसतानाही जालना ते वैजापूर हा मार्ग गद्दार अर्जुन खोतकरांच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. समृद्धी महामार्ग स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याच दबावामुळे रस्ते महामंडळाच्या अधिकाऱयांनी खोतकरांच्या वाहनांना रोखण्याचे धाडस केले नाही.

केवळ सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपणच खरे असल्याची बतावणी करत बीकेसीवर दसरा मेळावा घेण्याचा घाट घातला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते रोजंदारीवर मुंबईला नेण्यात येत आहेत. ईडीच्या कारवाईला घाबरून शिंदे गटात उडी मारणारे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी या मेळाव्यासाठी 100 वाहने नेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जालना येथून खोतकरांची वाहने मुंबईकडे निघाली. या वाहनांनी जामवाडी येथून ‘समृद्धी’ची वाट धरली. जालना ते वैजापूरपर्यंत ही वाहने समृद्धी महामार्गावरून गेली. उद्घाटन न होताच वाहनांसाठी समृद्धी महामार्ग कसा काय खुला करण्यात आला याविषयी संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दबावापोटी या अधिकाऱयांनी आपले तोंड बंद ठेवले.

सत्तेचा दुरुपयोग करणाऱयांवर कारवाई करा – अंबादास दानवे

समृद्धी महामार्ग अजून जनतेसाठी खुला झालेला नाही, अजूनही कामे अपूर्ण आहेत. मात्र मुंबईत होऊ घातलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी सत्तेचा सर्रास दुरुपयोग होत आहे. आज झालेल्या अपघातावरून हे समोर आले आहे. त्यामुळे तेथून प्रवास करणाऱयासह संबंधित अधिकाऱयांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

नमनालाच अपघात

जालन्याहून सुसाट निघालेली अर्जुन खोतकर यांची वाहने वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने दौलताबादजवळ एकमेकांवर धडकली. या अपघातात दहा वाहनांचा चुराडा झाला असून, एक जण जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.