
सॅमसंग या स्मार्टफोन कंपनीवर हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. या सायबर हल्ल्यामुळे कंपनीचा 190 जीबी डेटा लीक झाल्याचं वृत्त आहे. कंपनीनेच ही माहिती जाहीर केली आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने एका हॅकर ग्रुपवर आपला डेटा हॅक केल्याचा आरोप केला आहे. बूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, या हॅकर्सच्या पथकाने यापूर्वी एनव्हीडीया या कंपनीच्या सॉफ्टवेअरवरही हल्ला केला होता.
सॅमसंग कंपनीच्या प्रक्वक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने या हल्ल्यानंतर अजून कोणतंही नुकसान होणार नाही, याची तयारी केली आहे. सुदैवाने या डेटा लीकमध्ये त्यांच्या ग्राहकांचा डेटा लीक झालेला नाही. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय डेटावर हल्ला करण्यात आला आहे.
सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात गॅलेक्सी या डिव्हाईसच्या ऑपरेशनशी संबंधित काही सोर्स कोड लीक झाले आहेत. पण, ग्राहकांच्या किंवा सॅमसंग कर्मचाऱ्यांच्या खासगी डेटावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आम्ही आवश्यक ते बदल केले आहेत आणि आम्ही आमच्या ग्राहकांना अखंडितपणे सेवा देत राहू, असं आश्वासनही सॅमसंगतर्फे देण्यात आलं आहे.
या हल्लेखोर हॅकर्स ग्रूपचं नाव LAPSUS$ असं असून त्यांनी सॅमसंगच्या डेटामधील 190 जीबी डेटा लीक करून त्याची फाईल टेलिग्राम चॅनलवर टाकली. यात सॅमसंग कंपनीचे काही अत्यंत खासगी सोर्स कोडही असल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. हे कोड सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन डिव्हाईसच्या सिस्टिममध्ये घुसू शकतात, असा दावा हॅकर्सनी केला आहे.



























































