४४ फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सनाला ३१ तासांनंतर बाहेर काढण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंगेर

बिहारमधील मुंगेर जिल्हयात मंगळवारी एक ३ वर्षाची चिमुरडी खेळताना ४४ फूट बोअरवेल मध्ये पडली होती. सना असे तिचे नाव असून तिला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तब्बल ३१ तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. बोअरवेल मध्ये सीसीटीव्ही सोडण्यात आले होते. त्याद्वारे सनाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी केलेल्या बचाव कार्याला यश आले असून बुधवारी रात्री ९.३० वाजता सनाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला मुंगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसामुळे आणि बोअरवेलमध्ये सनाचा पाय अडकल्याने बचाव कार्यात विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सना मंगळवारी आजीला भेटण्यासाठी आईबरोबर मुंगेर येथे आली होती. दुपारचे जेवण झाल्यावर ती घराबाहेर खेळत होती. बराचवेळ झाला तरी ती घरात न आल्याने तिची आई तिला शोधण्यासाठी बाहेर आली. तिला सना कुठेही दिसली नाही. दरम्यान, बाजूच्या घरात राहणाऱ्या मुलांनी ती बोअरवेलजवळ खेळत असल्याचे पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर सनाच्या आईने बोअरवेलजवळ जाऊन सनाला हाक मारली. सनाने त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर तिच्या आईने व शेजाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी बचाव पथकाला पाचारण केले. तेव्हापासून सनाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होता. बोअरवेलमध्ये ऑक्सिजनही पुरवण्यात आला होता. तसेच तिच्या डोळ्यात चिखल, माती जाऊ नये म्हणून एक चष्माही बोअरवेलमध्ये टाकण्यात आला होता. सनाला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या बाजूलाच मोठा खड्डा खोदण्यात आला होता.

बचाव कार्याला विलंब होत असल्याने कुटुंबियांचा धीर खचला होता. अखेर सनाला बाहेर काढण्यात आल्यावर तिच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिने सनाला मिठी मारली.सनाने बाहेर आल्यावर पाणी घेतले आणि काही खाण्यास मागितले. तिला खाऊ म्हणून चॉकलेट देण्यात आले. तिला बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात पाठवण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. ४४ फूट खोल बोअरवेलमधून सना सुखरुप बाहेर पडणे हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते. बचाव दलाच्या अथक परिश्रमामुळे हा चमत्कार शक्य झाला.बोअरवेलमध्ये पडल्यानंतर जीवन-मत्यूच्या झुंजीत सनाने बाजी मारली.