
सामना ऑनलाईन । नागपूर
मध्य रेल्वेवरील दिवा स्टेशन व आसपासच्या परिसरात लोकसंख्या सध्या तीन लाखांच्यावर गेली आहे, पण या भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन नसल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे दिवा विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
गेल्या काही वर्षांपासून दिवा शहर व आसपासच्या ग्रामीण परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दिवा विभागाला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये समाविष्ट केले आहे. दिवा येथे मुंब्रा पोलीस स्टेशनअंतर्गत एकच पोलीस चौकी असून त्या ठिकाणी दिवसा व रात्री मिळून दोनच पोलीस असतात. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन पोलीस अपुरे पडतात. दिवा परिसरातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जावे लागते. दिवा ते मुंब्रा हे अंतर खूप असल्याने गुन्हेगारांचे फावते. पोलीस पोहचण्याआधीच गुन्हेगार पसार होतात. दिवा शहराला लागूनच साबेगाव, आगासन, वेतवडे, म्हातार्डी, दातिवली व इतर ग्रामीण परिसर येतो. या सर्व पार्श्वभूमीवर दिवा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे ही काळाची गरज आहे. याबाबत मी सातत्याने मागणी करूनही आतापर्यंत दिवा विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन स्थापन केलेले नाही असे भोईर म्हणाले. दिवा विभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज सुभाष भोईर यांनी व्यक्त केली.
























































