निजामकालीन शाळांच्या बांधणीसाठी तात्काळ निधी द्या – आमदार डॉ. पाटील

43

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत निजामकालीन शाळांची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यास सर्व शाळांच्या धोकादायक इमारती पाडून नव्याने बांधणी करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक तो निधी तात्काळ मंजूर करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.

शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लक्षवेधी सुचनांच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. १०० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची आज दुरावस्था झाली आहे. भिंतींना तडे गेलले आहेत. काही शाळांचे पत्रे देखील उडून गेले आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारतीत ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेषत: पावसाळ्यात या इमारती तक धरतील की नाही? या बद्दल शंका निर्माण झाली आहे. विद्याथ्ऱ्यांच्या जीवाशी शासन खेळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक निधी तात्काळ मंजूर करण्याची मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. लक्षवेधीला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परभणी जिल्ह्यातील संबंधीत शाळांबरोबरच राज्यातील निजामकालीन सर्व शाळांच्या इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामविकास व शिक्षण विभागाच्या वतीने आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या