श्रीरामपूरात वाळू तस्करांकडून कामगार तलाठी यांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

गोदावरी नदी काठावरील नागरिकांचा विरोध असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या नायगाव येथील कामगार तलाठी यांना मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली. याबाबत कामगार तलाठी नंदकुमार वल्लप्पा नागापुरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आयपीएस आयुष नोपाणी यांनी वाळू तस्करीसह अवैध धंदे बंद केले होते. त्यांची बदली होऊन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर घरफोडी, अवैध धंदे, वाळू तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे. वाळू तस्करांनी थेट कामगार तलाठ्याला अंधारात ओढत नेत धक्काबुक्की करत हल्ला केला. गावकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे पोलीस संरक्षणासह पोलीस चौकीची मागणी केली.

तालुका पोलिसांनी कामगार तलाठी नंदकुमार वल्लप्पा नागापुरे यांनी तक्रार दाखल केली असून नवे नायगाव शिवारात वाळू तस्करी रोखण्यासाठी कर्तव्य बजावत असताना दोन वाळूने भरलेले ट्रक थांबवून कारवाईसंबंधी काम करत असताना इतर आरोपींनी तेथे येत ट्रकच्या चालकाला 7 जणांनी शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सातही आरोपी फरार आहे, पोलीस त्यांचा शोध घेत आहे, असे पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव पाठविणार
वाळू तस्करांनी कामगार तलाठ्यांना मारहाण केली आहे मी तसेच पोलीस निरीक्षक सानप, पोलिस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना प्रस्ताव पाठविला जाईल.
– प्रशांत पाटील, तहसीलदार , श्रीरामपूर