
महसूल पथकाची चाहूल लागताच वाहने पळवून नेणाऱ्या वाळूतस्करांना तहसिलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी पहाटे धडा शिकविला. मध्यरात्रीपासून चार तास नाल्यामध्ये दबा धरून बसलेल्या या पथकाने पहाटे वाळूची वाहतूक करणारी चार वाहने रंगेहात पकडली. त्यापैकी एक वाहन पळवून नेण्यात तस्कर यशस्वी झाले. या वाहनमालकांना एकूण 9 लाख 49 हजार 524 रूपयांच्या दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
तालुक्यातून वाहणाऱ्या कुकडी, मुळा, काळू तसेच मांडओहळ नदीपात्रातून मोठया प्रमाणात वाळूची तस्करी होत असून त्याविरोधात तहसिलदार ज्योती देवेरे यांनी मोहिम उघडली आहे. महसूल पथक कारवाईला निघाल्यानंतर पाळतीवर असलेले वाळू तस्करांचे हस्तक नदीपात्रापासून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांपर्यंत ती माहिती कळवितात. त्यामुळे कारवाईला गेलेल्या पथकाला अनेकदा हात हालवित परतावे लागते. त्यामुळे कारवाईच्या पथकाची चाहूल वाळू तस्करांना लागू नये यासाठी तहसिलदार देवरे यांनी आतापर्यंत वेगवेगळया युक्ती वापरून वाळूतस्करांवर कारवाई केली आहे.
खडकवाडी येथून वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहीती समजल्यानंतर देवरे यांनी महसूल पथकासह पोलीस यंत्रणांसोबत घेउन आळेफाटा जिल्हा पुणेमार्गे खडकवाडी परिसरात प्रवेश केला. मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत वाळूतस्कर वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने या पथकाने जवळच्या नाल्यात तब्बल चार तास दबा धरला. पहाटेच्या सुमारास चार वाहने येत असल्याचे लक्षात येताच त्यांना अडविण्यात येउन ताब्यात घेण्यात आले. मात्र, कारवाईदरम्यान एक डंपर पळवून नेण्यात तस्कर यशस्वी झाले. या कारवाईत एकाच क्रमांकाचे दोन डंपर तसेच विना क्रमांकाचे दोन डंपर ताब्यात घेण्यात आले होते. पळवून नेण्यात आलेल्या वाहनमालकाविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरीत तीन वाहनांच्या मालकांना प्रत्येकी 3 लाख 16 हजार 508 असा एकूण 9 लाख 49 हजार 524 रूपयांचा दंड ठोठावण्यात येउन तशा नोटीस बजावण्यात आल्याचे तहसिलदार देवरे यांनी सांगितले. या कारवाईत तहसिलदार ज्योती देवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पी. टी. वाघ, तलाठी एस. एस. मोरे, तलाठी ए. बी. मंडलीक, तलाठी ए. बी. डोळस, अव्वल कारकून शरद झावरे, कॉन्स्टेबल आर. एल. ऐलार, ए. एन. रोकडे, बी. के. गायकवाड हे सहभागी झाले होते.




























































