हरणा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱया आठजणांना अटक

हरणा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱया आठजणांना पोलिसांनी अटक केली असून, 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेकुंबर लल्लू नदाफ, नेताजी महादेव पवार, परमेश्वर मारुती पवार, रतन महिबूब नदाफ, मुबारक बशीर कोतवाल, मुतण्णा अंबाजी कोळी, बालाजी महादेव पवार, नेताजी पवार (सर्व रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या दोन डम्पिंग ट्रेलरच्या साहाय्याने वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. वाळू पॉइंटच्या ठिकाणी छापा टाकून दोन डम्पिंग ट्रेलर, ट्रक्टरहेड असा 14 लाख 15 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शेकुंबर नदाफ, नेताजी पवार, परमेश्वर पवार, रतन नदाफ, मुबारक कोतवाल, मुतण्णा कोळी, नेताजी पवार, बालाजी पवार यांना अटक करण्यात आली आहे. वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.