संदीप गाडोली एन्काऊंटर- हरयाणातील फरार गँगस्टर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील स्थानिक गँगस्टर संदीप गाडोली याच्या हत्येचा कट रचून तीन वर्षांपूर्वी त्याची हरयाणा पोलिसांच्या मदतीने बोगस एन्काऊंटर घडवून आणणारा आणि या गुह्यातील फरार आरोपी व गाडोलीचा कट्टर प्रतिस्पर्धी वीरेंद्रकुमार ऊर्फ बिंदर करणसिंग गुज्जर (41) अखेर गजाआड झाला. मुंबई गुन्हे शाखेने हरयाणात जाऊन त्याला बेडय़ा ठोकल्या.

7 फेब्रुवारी 2016 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरपोर्ट मेट्रो हॉटेलात संदीप गाडोली या कुख्यात गँगस्टरचा हरयाणा क्राइम ब्रँचच्या पथकाने एन्काऊंटर केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मुंबई क्राइम ब्रँचने या गुह्याचा तपास केला असता हा एन्काऊंटर बोगस असून हरयाणा पोलिसांनी गाडोलीचा प्रतिस्पर्धी आणि हरयाणामधील  स्थानिक गँगस्टर वीरेंद्रकुमार ऊर्फ बिंदर करणसिंग गुज्जर याच्या सांगण्यावरून हा एन्काऊंटर केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर संबंधित पोलीस व घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोघा तरुणींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र वीरेंद्रकुमार आणि त्याचा साथीदार फरार झाले होते. वीरेंद्रकुमार भोंडसी कारागृह परिसरात नक्की सापडेल अशी खबर मिळताच युनिट-10 चे प्रपोनि सुनील माने व युनिट-12 चे प्रपोनि सागर शिवलकर तसेच अंमलदार जगदीश धारगळकर आणि सचिन ठोंबरे या पथकाने गुरुग्राम हरयाणा गाठून वीरेंद्रकुमार ऊर्फ बिंदर करणसिंग गुज्जर याच्या मुसक्या आवळल्या. त्याला मुंबईत आणून कोर्टात हजर केले असता 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

कारागृहातून सुटला आणि पोलिसांनी उचलला
हरयाणा येथेदेखील विधानसभा निवडणूक असल्याने तेथील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून वीरेंद्रकुमारला ताब्यात घेतले होते. त्याला मतदान प्रक्रिया होईपर्यंत भोंडसी कारागृहात ठेवले होते. तो 22 तारखेला कारागृहाबाहेर येणार असल्याची पक्की खबर माने व शिवलकर यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी 21 तारखेलाच गुरुग्राम हरयाणा गाठून भोंडसी कारागृह परिसरात सापळा रचला. 22 तारखेला वीरेंद्रकुमार कारागृहाबाहेर येताच माने व शिवलकर यांच्या पथकाने त्याला उचलून मुंबईत आणले.