
>> संदीप वाकचौरे
राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नवीन शालेय शिक्षण आराखडय़ानुसार देशभरात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत व अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येत आहेत. दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून किमान दोनदा व्हावी तसेच विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत भाषा विषयांची सक्तीसुद्धा करण्यात आली आहे. या धोरणाचा उद्देश चांगला असला तरी वास्तव वेगळे आहे. देशात सव्वा लाख शाळा एकशिक्षकी असताना, प्राथमिक शैक्षणिक पायाभूत सुविधांची वानवा असताना या बदलांचे शिवधनुष्य कसे पेलले जाणार? हा खरा प्रश्न आहे.
देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या धोरणानुसार अंगणवाडी ते उच्च शिक्षण अशा सर्व स्तरांवर बदल होणार आहे. धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर बदल अपेक्षित आहे. बदलाचे शिवधनुष्य मोठे आहे. धोरणाने अपेक्षित केलेले बदल हे काही एकाच वेळी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे बदल घडणार आहेत. नवे शैक्षणिक धोरण अत्यंत आदर्शवादी आहे. त्यामुळे धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात काही शंकाही उपस्थितीत केल्या जात आहेत. या धोरणाने अपेक्षित केलेले बदल होणारच नाहीत असे म्हणता येणार नाही. तथापि, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लागणारे गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ आणि आर्थिक निधी यांबाबत हात आखडता घेतला गेला तर अपेक्षित परिणामांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
नव्या धोरणामुळे आकृतीबंधात बदल होतो आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे सूचित केले आहे. उच्च माध्यमिक स्तरावर सध्याच्या शाखानिहाय रचना संपुष्टात येण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. उच्च प्राथमिक स्तरावर व्यावसायिक शिक्षणाचा आरंभ होणार आहे. हे बदल वरवर सोपे वाटत असले तरी ती वाट फार सुलभ आहे असे मात्र नाही.
वर्षातून दोनदा परीक्षा हा पर्याय स्वागतार्हच आहे. देशात यासारखे पर्याय यापूर्वी काही राज्यांनी स्वीकारलेही आहेत. मात्र परीक्षांची संख्या वाढवली तर खरंच विद्यार्थ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल का? शिक्षणात ताणतणाव आहेतच. मात्र ते खऱया शिक्षणाचे कमी आहेत आणि पालकांच्या अपेक्षांचे अधिक आहेत. शिक्षणाच्या खोटय़ा प्रतिष्ठsतूनही ते तणाव वाढत आहेत. अलीकडे शिक्षणात शिक्षण प्रक्रियेचे महत्त्व उरलेले नाहीये. शिकण्यापेक्षा परीक्षाच अधिक महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत. शिक्षण आणि त्याच्या उद्दिष्टांचा विचारच जणू हरवत चालला आहे. शिक्षणातून गुणवत्ता हवी आहे, पण त्यासाठी शिकणे महत्त्वाचे आहे. अलीकडे पालकांना आपल्या पाल्यांसाठी केवळ परीक्षेतील मार्क हवे आहेत. कोटा येथील शिक्षण फॅक्टरीत गेल्या आठ महिन्यांत सुमारे 22 आत्महत्या झाल्या आहेत. अलीकडेच लातूरच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. परीक्षांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल असे वाटत असले तरी मुळात शिक्षणात ताणतणाव आणि ओझे नेमके कशाचे आहे याचाही विचार करण्याची गरज आहे.
राज्यात गेली काही वर्षे शिक्षक संघटना आम्हाला शिकवू द्या अशी मागणी करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणताही अडथळा आणता येणार नाही, शिक्षक हा गुणवत्तेच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे म्हटले आहे. नव्या धोरणातील यश हे देशातील शिक्षण क्षेत्रातील मनुष्यबळावर अवलंबून असणार आहे. गुणवत्तावान शिक्षकांच्या प्रयत्नांचे फलित असणार आहे. अशा वेळी देशात सुमारे आठ टक्के शाळा या एकशिक्षकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.
देशात 15 लाखांहून अधिक शाळा आहेत. यातील सुमारे सव्वा लाख शाळांना केवळ एक शिक्षक आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार देशातील 60 पटांपर्यंत प्रत्येक शाळेत किमान दोन शिक्षक उपलब्ध करून दिले जातील असे म्हटले होते. आता कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन जवळपास 13 वर्षे होत आली आहेत तरी या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यात देशातील बहुतांश राज्ये अपयशी ठरली आहेत. ‘खडू फळा योजने’च्या वेळीदेखील किमान दोन शिक्षक असावेत, असे म्हटले होते. मात्र अद्याप तरी आपण या किमान गरजा पूर्णत्वाला नेऊ शकलो नाही हे वास्तव आहे. गरजेप्रमाणे पुरेसे शिक्षक आपण देऊ शकलो नाही, तर धोरणात अपेक्षित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये क्षमतांचे विकसन कसे करणार? हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेल्या क्षमतांचे विकसन करायचे असेल तर अधिक सूक्ष्मतेने विचार करण्याची गरज असणार आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत समजल्या जाणाऱया राज्यातही एकशिक्षकी शाळांची संख्या फार नसली तरी ती अदखलपात्र निश्चित नाही. देशात जेव्हा धोरणाची अंमलबजावणी करायची आहे असे म्हणतो तेव्हा पुरेसे आणि गुणवत्तेचे मनुष्यबळ उपलब्ध असावे लागेल. शिक्षकांविना गुणवत्तेची वाट कशी चालणार? हा प्रश्न आहे.
आज महाराष्ट्राच्या स्थापनेला 63 वर्षे उलटूनही आपल्या राज्यात शैक्षणिक क्षेत्रातील भौतिक सुविधांच्या बाबतीत शंभर टक्के यश मिळू शकलेले नाही. राज्यात एक लाख सहा हजार 491 शाळांपैकी तीन हजार 916 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे अस्तित्वात नाहीत. 12 हजार 173 शाळांना संरक्षण भिंती नाहीत. 38 हजार 952 शाळांना संगणक संच नाहीत. 7 हजार 304 शाळांना उतरता रस्ता नाही. 14 हजार 501 शाळांमध्ये खेळांची मैदाने नाहीत. 11 हजार 326 शाळांना ग्रंथालये नाहीत. 1 हजार 800 शाळांना विद्युत जोडणी नाहीत. महाराष्ट्राची अशी स्थिती असेल तर गरीब-बिमारू राज्यांत काय दशा असेल याची कल्पनाच न केलेली बरी. किमान पायाभूत सुविधा पुरविण्यात आपल्याला अद्याप यश मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
उच्च माध्यमिक स्तरावर सध्याच्या विविध शाखांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे सूतोवाच नव्या धोरणात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे विषयांची निवड करता येणार असली तरी त्याप्रमाणे शिक्षकांची उपलब्धता हे मोठे आव्हान असणार आहे. देशात आजही शेकडो विषय परीक्षा मंडळाच्या यादीत आहेत, पण त्या विषयांच्या अध्ययन व अध्यापन सुविधा विद्यार्थी जेथे शिकत आहेत तेथील महाविद्यालयात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभिरुची, कल वेगवेगळे असूनही जे विषय महाविद्यालयात आहेत तेच विषय निवडावे लागतात. नव्या धोरणातील विविध विषय निवडीचा विचार अत्यंत चांगला आहे. तसे घडले तर शिक्षण अधिक आनंददायी व तणावमुक्त होण्यास निश्चित मदत होणार आहे. मात्र त्यादृष्टीने आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळाच्या प्रश्नाकडे कसे पाहिले जाणार हे महत्त्वाचे आहे. देशात लाखो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अध्यापनाबरोबरच अशैक्षणिक कामाचा भार आहे. अशा वेळी शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व अपेक्षित परिणाम कसा साध्य करणार? त्यामुळे धोरण चांगले असले तरी परिणामांसाठी गुंतवणूक उंचावल्याशिवाय हाती काहीच लागणार नाही. अर्थात, धोरणातही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यांपर्यंत खर्च अपेक्षित केला आहे. तो टप्पा आजवर पार करता आलेला नाही.1965ची ही शिफारस 2023ला कायम आहे. त्यामुळे गुंतवणूक उंचावल्याशिवाय मनुष्यबळ आणि भौतिक सुविधाही प्राप्त करता येणार नाहीत. त्यामुळे विचार करायलाच हवा. अन्यथा धोरणाची अंमलबजावणी सुरू राहील आणि परिणामांची प्रतीक्षा कायम असेल.
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत.)





























































