
आर्णी नगर परिषदेतील गैरव्यवहारप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरही समाधान न झालेल्या भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा आततायीपणा सभागृहासमोर आला. संदीप धुर्वे यांनी अधिकाऱयाला निलंबित करा नाहीतर विधानसभा गॅलरीतून उडी मारतो, अशी धमकी देत गॅलरीच्या कठडय़ापर्यंत येऊन त्यासाठी केलेल्या प्रयत्नाने सभागृह हादरले.
सभागृहात आर्णी नगर परिषदेचा तारांकित प्रश्न आमदार संदीप धुर्वे यांनी मांडला. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आर्णी नग रपरिषदेतील प्रश्नावर उत्तर सुरू केले. त्याचवेळी दुसरीकडे संदीप धुर्वे यांनी माझे म्हणणे ऐकून घ्या, नाहीतर गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी दिली. ते उडी मारण्यासाठी सभागृह गॅलरीच्या कठडय़ापर्यंत आले. यावेळी अन्य भाजप आमदारांनी त्यांना परावृत्त करायचे सोडून उलट धुर्वे यांना त्यासाठी प्रोत्साहनच दिले. यावेळी संतप्त झालेले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तुमच्या प्रतिनिधीला शांत करा अशा सूचना भाजप नेत्यांना दिल्या.
मी उडी मारणार नव्हतो
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही सभागृहाची शिस्त आहे का, याला सभागृह म्हणतात का? काय चाललंय सभागृहात, असा सवाल करीत अशा आमदारांवर कारवाई करा, अशी मागणी केली. त्याच वेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सदस्य उडी मारण्याचा प्रयत्न करताहेत. आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आपण कारवाई करणार का, असा सवाल उपाध्यक्षांना केला. अखेर धुर्वे यांना स्पष्टीकरण करावे लागले. मी उडी मारणार नव्हतो. केवळ आर्णी नगर परिषदेच्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करण्याची माझी मागणी होती. आपले लक्ष वेधण्यासाठी मी आवाज देत होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.






























































