
खासदार राहुल गांधी यांनी देशाछी एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य दिव्य पदयात्रेत युवक, महिला, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागतासह भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली असून सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या या यात्रेचा आपल्या सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोदगार या यात्रेचे समन्वयक तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.
काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेर नगरपालिका ते नवीन नगर रोड अशी विराट पदयात्रा झाली. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सभेत व्यासपीठावर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिकचे राजाराम पानगव्हाणे, महिला काँग्रेसच्या सचिव उत्कर्षाताई रुपवते, ॲड. माधवराव कानवडे आदींसह संगमनेर तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्याची दहा वर्ष तुरुंगात काढली.राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. हा देश व लोकशाही टिकवण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3560 किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेत ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन चालत होते. विविध संघटना व लोकशाहीवर विश्वास असणारे सर्वजण एकत्र येत होते. महाराष्ट्रात देगलूर पासून सुरू झालेली यात्रा सात जिल्ह्यातून गेली. अत्यंत उत्साहात सर्वांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद व शेगावची झालेली ऐतिहासिक सभा हे या यात्रेचे मोठे वैशिष्ट्य ठरले. रेकॉर्ड ब्रेक असणारी ही पदयात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली आहे.’
‘ऊन वारा पाऊस असा प्रवास करत या यात्रेतून बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. तोच संदेश घेऊन आपल्या सर्वांना पुन्हा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काम करायचे आहे. देशात व राज्यात वातावरण बदलले आहे. जाती व धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपाची मोजक्या राज्यांमध्ये सत्ता राहिली आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. मणिपूर अशांत आहे, महिलांवर सर्वत्र अत्याचार होत आहेत. पंजाब मध्ये शेतकरी आंदोलनामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. कुस्तीगीर मुलींचे आंदोलन दडपले गेले. मराठा, धनगर, यांचे सह विविध समाजाचे आंदोलन दडपले जात आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार मूळ प्रश्नांवर भर देण्याऐवजी जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करत आहे. ईडी व सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजप पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. आगामी काळात देशात व राज्यात परिवर्तन नक्की असून काँग्रेसचा समतेचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
























































