भोंदू गडगेच्या आश्रमाला आठ केव्ही वीजचोरीचा झटका, पावणेदोन लाखाचे बिल भरले कोणी; शहरभर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र बापू गडगे याच्या आश्रमावर महावितरणने आठ किलो वॅट वीजचोरीचा ठपका ठेवत 1 लाख 86 हजार 650 रुपयांचा दंडात्मक बिलाचा दणका दिला. मात्र, हे वीजबिल एका झटक्यात भरण्यात आले. मात्र, एवढे मोठय़ा रकमेचे बिल भरले कोणी, याबाबत शहरात चर्चेला उधान आले आहे.

वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. गडगे याच्या आश्रमावर धाड टाकत अधिकाऱयांनी मीटर जप्त करून थेट वीजपुरवठा बंद केला. मात्र, कारवाईनंतर अवघ्या दोन दिवसांत ही मोठी रक्कम भरली गेल्याने बिल भरलं तरी कोणी, असा सवाल आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

पोलिसांनी भोंदू गडगेला अटक करत आश्रम सील केला असून, न्यायालयाने दोघांना 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अधिकृत विद्युत मीटर बायपास करून 8 किलो वॅटचा अनधिकृत वापर, एसी, बोअरवेल आणि झगमगाटासाठी मोठय़ा प्रमाणात खांबावरून वीज खेचली जात असल्याचे उघड झाले आहे. आश्रमात गडगे कुटुंबाच्या नावावर चार मीटर असल्याची माहितीही पुढे आली आहे.

दरम्यान, मुदतीत दंड न भरल्यास वीज कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा महावितरणने दिला होता. मात्र, आश्रम सील असताना आणि मुख्य आरोपी कोठडीत असताना तसेच अन्य तीनजण फरार असताना इतकी मोठी रक्कम नेमकी कोणी आणि कशी भरली, याची पोलीस प्रशासनाला खबर बात नसल्याने संशयाची सुई आणखी तीव्र झाली आहे. भोंदू गडगे याच्यावर अनेकांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आधीपासूनच आहे. या भोंदू बाबाने करचुकवेगिरी करून लाखो रुपयांचा महसूल बुडवला असण्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे.