
पावसाळा तोंडावर आल्याने महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामांवर भर दिला आहे. शहरातील नालेसफाईस सुरुवात करण्यात आली आहे. मोठय़ा नाल्यांना जाळ्या लावण्यात येत आहेत. पाणी साचून राहणाऱया जवळपास 250हून अधिक भूखंडधारकांना नोटिसा देऊन भूखंड स्वच्छ करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे हायरिस्क एरियात औषध फवारणीवर जोर देण्यात आला आहे. रस्ते पॅच वर्कच्या कामांनाही प्रारंभ करण्यात आला आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे संकट गडद झाले आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात छोटे-मोठे 86 नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी दरवर्षी 25 ते 30 लाख रुपयांचा निधी खर्च केला जातो. गतवर्षी प्रशासनाने दीड कोटींचा निधी नालेसफाईसाठी खर्च केला होता. आता नालेसफाईची कामे गतीने सुरू करण्यात आली आहेत. जेटिंग मशीन, जेसीबी मशीनच्या साहाय्याने नाले, गटारी, स्वच्छ करण्यात येत आहेत. स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये प्लॅस्टिक कचरा जाऊन पुन्हा चोकअप होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे. महापालिका क्षेत्रातील 18हून अधिक मोठय़ा नाल्यांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. नाल्यातील जलपर्णी काढली जात आहे.
रस्त्यावरील पॅचवर्कच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा
पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पॅचवर्कच्या कामांना गती देण्यात आली आहे. पॅचवर्कच्या कामासाठी महापालिकेने स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. यामध्ये दोन रोलर, दोन बॉयलर मशीन आणि दोन ट्रक्टरचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही रस्त्याचे पॅचवर्क करणे आता सोपे झाले आहे.
भूखंडधारकांना नोटिसा
– महापालिका क्षेत्रात अनेक खुले भूखंड आहेत. या भूखंडांवर मोठय़ा प्रमाणात गवत, झाड-झुडपे वाढलेली असतात. परिणामी पावसाचे पाणी अशा भूखंडांवर साचून राहते. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढते आणि साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मोकळ्या भूखंडधारकांना आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. भूखंड स्वच्छ करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय हायरिस्क एरियात औषध तसेच पावडर फवारणी सुरू केली आहे.

































































