
चांदोली आणि कोयना धरण पाणलोटक्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. जिह्यात पावसाची रिमझिम सुरूच राहिली. कृष्णा आणि वारणा नदीकाठावर पुराचा धोका निर्माण झाला होता; परंतु पाऊस कमी झाल्याने पुराचा धोका तूर्त टळल्याचे दिसून येत आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी आज दिवसभर स्थिर होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला.
धरण पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पावसाचा जोर कमी झाला. चांदोली धरणक्षेत्रात 24 तासांत 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठय़ात वाढ सुरूच असल्याने धरणातून 1723 क्युसेकने विद्युतगृहातून विसर्ग सुरू आहे. सध्या 22.99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. खानापूर, पलूस, कडेगाव, मिरज आणि वाळवा तालुक्यांत रिमझिम सुरूच आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी संध्याकाळी 19 फुटांवर स्थिर आहे. पावसाचा जोर सुरूच राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढू शकते.





























































