सांगलीत चोरगणपतीची प्रतिष्ठापना; 200 वर्षांची परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाच्या भीतीने यंदा सांगली पंचायतन संस्थानच्या गणेश उत्सवाचा उत्साह मावळला आहे. यंदा कोरोनामुळे भक्तांशिवाय उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय गणपती पंचायतन ट्रस्टने घेतला आहे. गणेशोत्सवासाठी चोर पावलाने येणाऱ्या चोर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला दोनशे वर्षाची परंपरा आहे. सर्व मंदिर पाच महिन्यांपासून बंद असल्याने गणेशाची फक्त पूजा अर्चा केली जाणार आहे. गणपती संस्थांच्या गणेश उत्सवाचा दरवर्षी उत्साह असतो. पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या तीन दिवस आधी प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला, अन् केव्हा गेला याचा भक्त भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे. गुरुवारी प्रतिपदेला या चोर गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ती तशीच आहे त्यानंतर दरबार हॉलमध्ये संस्थानचा गणेशोत्सव थाटामाटात सुरू होतो. यंदा कोरोनामुळे भक्ताशिवाय संस्थानचा गणेशोत्सव होणार आहे.