
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्धीची हौस भागवण्याच्या नादात ‘ईडी’ सरकारने ऐन दिवाळीत सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सण सुरू झाला तरी अद्यापि जाहीर केलेली दिवाळी किट जनतेला मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यातच फराळाचे पदार्थ करण्याऐवजी रेशनच्या रांगेत पॉज मशीन सुरू होण्याची वाट पाहत महिलांना भर पावसात बसून राहावे लागले आहे. सांगली जिल्हा शिवसेनेने सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या या कृतीबद्दल निषेध केला आहे.
सांगली जिह्यात सर्वत्र पॉज मशीन बंद पडत असल्याच्या तक्रारी शिवसैनिकांकडे प्राप्त होत असून, हिंदू धर्मातील सर्वांत मोठय़ा सणाच्या वेळी शासनाने सर्वसामान्य हिंदू जनतेची घोर थट्टा आणि अवहेलना केली आहे. त्यामुळे ईडी सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने शंभर रुपयांमध्ये सर्वसामान्यांना दिवाळी किट देण्याची घोषणा ईडी सरकारने केली होती. त्या वस्तूंवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापले असले पाहिजेत, या सरकारच्या प्रसिद्धीच्या हपापलेपणाचा आग्रह होता. यामुळे सर्वसामान्य जनतेला ऐन सणात वस्तू मिळणार नाहीत, याची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱयांना हे वास्तव नजरेसमोर आणून देत पॉज मशीनऐवजी नोंदणी करून दिवाळीचे साहित्य देण्याच्या मागणीसाठी भेट मागितली होती. मात्र, हे निवेदन स्वीकारले तर राज्य सरकार नाराज होईल, या भीतीने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. शेवटी शिवसेना पदाधिकाऱयांनी निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱयांच्या कक्षाबाहेरील काचेवर चिटकवली होती. इतके होऊनही प्रशासनाकडून सौजन्यशीलता आणि क्रियाशीलता न दाखवल्याने आज सांगली जिह्यातील प्रत्येक रेशन दुकानासमोर महिला पॉज मशीन सुरू होण्याची वाट बघत भर पावसात ताटकळत उभे आहेत.
घरात सण आहे म्हणून फराळासाठी कष्ट घ्यायच्या काळात या महिलांना रेशनच्या रांगेत दिवसभर उभे करून ईडी सरकार आणि सांगली जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य गरीब माणसांचा घोर अपमान केला आहे. अजूनही लोकांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा न घेता प्रशासनाने लोकांच्या हाती दिवाळीचे वाण सामान सोपवून त्यांना सणाच्या आनंदापासून वंचित ठेवू नये, अशी मागणीही शंभुराज काटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.


































































