सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीला रेकॉर्डब्रेक 30 हजारांचा दर, मात्र सौद्यांवेळी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

सांगली बाजार समितीत हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीला आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच रेकॉर्डब्रेक 30 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बेळगाव जिह्यातील गुरालपूर येथील शेतकरी रामाप्पा बसाप्पा मंगोंडर यांच्या हळदीला हा रेकॉर्डब्रेक दर मिळाला. दरम्यान, सौद्याच्या वेळी कोरोनाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसविण्यात आल्याने बाजार समितीतील इतर व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बेळगाव जिह्यातील गुरालपूर येथील हळद उत्पादक शेतकरी रामाप्पा बसाप्पा मंगोंडर यांच्या हळदीला विक्रमी दर मिळाला. ‘संगमेश्वर ट्रेडर्स’ या दुकानामध्ये काढलेल्या हळदसौद्याला प्रतिक्विंटलला 30 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला. ही हळद ‘विवेक ट्रेडिंग कंपनी’ने खरेदी केली. सांगली बाजार समितीच्या वतीने सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते आडते काडाप्पा वारद आणि शेतकरी मंगोंडर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक जीवन पाटील, वसंत गायकवाड, बाळासाहेब बंडगर, आडत संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, बाजार समितीचे सचिव एस. पी. चव्हाण, हळद उत्पादक शेतकरी उत्तप्पा सिद्धाप्पा इराप्पा उपस्थित होते.

सांगली बाजार समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच हळदीला रेकॉर्डब्रेक दर मिळाल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हळद उत्पादक शेतकऱयांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी आणावी, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, हळद सौद्याच्या वेळी मास्कचा वापर अथवा सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही, व्यापारी, आडते आणि हळद उत्पादक शेतकऱयांची मोठी गर्दी उसळते. कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवून हळदीची सौदेबाजी करणाऱयांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काही व्यापारीवर्गातून व नागरिकांतून होत आहे. जिल्हा प्रशासनाने हा प्रकार बंद करावा, अशी मागणीही व्यापारी व नागरिकांतून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या