सांगली जिल्ह्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी, तीस ग्रामपंचायतींवर फडकला भगवा

सांगली जिह्यातील 143 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून जिह्यात प्रथमच शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. आटपाडी तालुक्यातील 10 पैकी 9, खानापूर तालुक्यातील 11 पैकी 9, तासगाव तालुक्यातील 5 आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 11 पैकी 4 ग्रामपंचायतींची सत्ता शिवसेनेने ताब्यात घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने काही ग्रामपंचायतींची सत्ता हस्तगत केली. अनेक ठिकाणी सत्तांतर झाले.

सांगली जिह्यातील 152 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 143 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. जिह्यात सर्वाधिक तासगाव तालुक्यात 36 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यापैकी नरसेवाडी, बोलगाव, धामणी, निंबळक, पाडळी या चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला, तर मांजर्डे, विसापूर या दोन ग्रामपंचायतींची सत्ता महाविकास आघाडीने ताब्यात घेतली. भाजप आणि राष्ट्रवादीला तासगाव तालुक्यात बऱयापैकी ग्रामपंचायती पुन्हा ताब्यात ठेवण्यात यश आले. मात्र, अनेक ग्रामपंचायतींत सत्तांतरही झाले.

कडेगाव तालुक्यात 9 आणि पलूस तालुक्यात 12 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायती काढून घेण्यात यशस्वी ठरले.

शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडी सत्यजित देशमुख व आमदार मानसिंगराव नाईक गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने सर्व अकरा जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला. जांभळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलने सातपैकी सहा जागा जिंकून दणदणीत यश संपादन केले.

जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. उटगी, उमराणी, शेगाव, सनमडी, तिकोंडी, अंकले, गुड्डापूर या मोठय़ा ग्रामपंचायतींत भाजपने बाजी मारली आहे. स्थानिक विकास आघाडीने नऊ ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. काँग्रेसने 16, तर भाजपने 14 ग्रामपंचायती ताब्यात असल्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादीनेही तीन ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा केला आहे. स्थानिक आघाडीला 9 जागा मिळाल्या असल्याचे चित्र आहे. शेगाव, उमराणी, उटगी, अंकले, धावडवाडी, निगडी बुद्रुक, डोर्ली व सनमडी या आठ गावांत सत्तांतर झाले आहे.

मिरजेत शिवसेनेच्या 26 सदस्यांनी विजय मिळवला आहे. यामध्ये आरग, भोसे, तानंग, कवलापूर, कळंबीसह आठ गावांत ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, मिरज तालुकाप्रमुख संजय काटे, सूरज पाटील, मिरज विधान सभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, संपर्कप्रमुख दत्तात्रय माने मिरज शहर शिवसेनाप्रमुख चंद्रकांत मैगुरे, विशाल रजपूत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱयांनी आपली ताकद लावली होती.

आपली प्रतिक्रिया द्या