
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची प्रारूप मतदारयादी जाहीर करून आक्षेप मागविले होते. तसेच आक्षेप निकाली काढून 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी जाहीर करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. दुबार नावे वगळण्याची कार्यवाही पूर्ण करून 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
सांगली जिल्हा परिषदेचे 61 गट आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत गट-गणांची रचना, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रारूप मतदारयादीही प्रसिद्ध केली. नगरपरिषदांच्या प्रारूप मतदारयादीत मोठा घोळ झाला. त्यामुळेच 17 हजारांवर आक्षेप दाखल झाले. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदारयादीवर नाममात्र आक्षेप होते.
आक्षेप निकाली काढून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादीसंबंधी सुधारित आदेश काढून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील गोंधळून गेले आहे. जिल्हा परिषदेच्या 61 गटांतील मतदारयादीच्या प्रारूपावर आक्षेप सुनावणी झाली आहे. रविवारी अंतिम यादी येणार होती. मात्र, आता 3 नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढविली आहे.
3 नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रामाणित करून त्या करून त्या माहितीसाठी ठेवण्यात येत असल्याची सूचना प्रसिद्ध करावी. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची याची व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अंतिम मतदारयादीचा कार्यक्रम एक आठवडा लांबणीवर गेला आहे.
 
             
		




































 
     
    





















