
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका असूनही अत्यवस्थ रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णवाहिका नाकारल्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.
आरवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी संतोष यादव यांनी अत्यवस्थ रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका नाकारली. यावरून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितले की, 108 नंबरला फोन करा व ती गाडी मागावा असा सल्ला दिला. गाडी उपलब्ध असतानाही डॉक्टरांनी गाडी नाकारल्याने अधिकाऱ्यांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे.
शासनाच्या उपक्रमातून जिल्ह्याला मिळालेल्या रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेच्या वापरासाठी अवाजवी पैसे आकारले जात असल्याची तक्रार नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य गौरी भिंगार्डे यांनी केली आहे. तसेच या रुग्णवाहिकेचा खासगी कामासाठी वापर होत असल्याचेही ग्रामस्थानी ग्रामसभेत सांगितले. त्यामुळे या रुग्णवाहिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता कडवई घोसाळकर येथील सुमित्रा घोसाळकर या वृद्धेला हृदयविकाराचा झटका आल्याने रिक्षसंघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण हे सदर महिलेस आपल्या रिक्षातून घेऊन जात होते. त्यावेळी त्या अत्यवस्थ झाल्याने बाजारपेठेतील खासगी डॉक्टर समीर जाधव यांच्याकडे घोसाळकर यांना नेण्यात आले असता त्यांना उपचारासाठी पुढे हलवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
त्यावेळी चव्हाण यांनी तत्काळ कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संतोष यादव याना दूरध्वनीवरून रुग्णवाहिकेची मागणी केली असता रुग्णवाहिका उभी असताना 108 नंबरची रुग्णवाहिका मागवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका मागवली. तोपर्यंत रुग्णाची स्थिती गंभीर झाली होती. रुग्णाला पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी नंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

























































