
संगमेश्वर बाजारपेठेतील सर्वच एटीएममध्ये ऐन गणेशोत्सव काळात खडखडाट पसरला असून ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. किमान गणेशोत्सव काळात तरी बँकांनी एटीएममध्ये 24 तास पैसे उपलब्ध करून देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करत बँकांच्या उदासिनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणपती उत्सव काळात येणारा चाकरमानी संगमेश्वरमधील एटीएममधून पैसे काढून संगमेश्वरमध्येच खर्च करत असतो. पण कोणत्याही उत्सव काळात संगमेश्वरमधील एटीएम मधील पैसे संपल्यामुळे खूप लोकांची (चाकरमान्यांची) गैरसोय होते. त्यामुळे खूप लोक कंटाळून देवरूखला एटीएम मधून पैसे काढून तेथेच खरेदी करतात. संगमेश्वर मधील लहांनात लहान व्यापारी गणेश उत्सवाला लागणारा माल नियोजनपूर्वक दुकानात भरून ठेवतो कारण उत्सवाच्या काळात मोठी गर्दी बाजारपेठेत होत असते. ट्रॅफिक जॅम होत असते. त्यामुळे उत्सवाच्या काळात लागणारा माल तो आगाऊ भरून ठेवतो. जर लहानात लहान व्यापारी इतकं नियोजन करत असेल तर सणाच्या काळात पुरेल व आपल्याच बँक ग्राहकांची गैरसोय होणार नाही, असे नियोजन बँकेकडून का नाही करत असा सवाल व्यापारी आणि ग्राहकांनी केला आहे.
ज्या वेळी पैशांची गरज असते तेव्हा नेमकी पैशाअभावी एटीएम मशीन बंद असतात. याचा फटका संगमेश्वर व्यापारी वर्गाला बसत आहे. आधीच व्यवहार कोरोनामुळे ठप्प होते ते कुठे आता सुरळीत होत आहेत. पण अशा गैरसोयीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.




























































