विशाखा महाडिक खून प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। संगमेश्वर

विशाखाला न्याय मिळालाच पाहिजे , खुन्याला फाशी झालीच पाहिजे , खून प्रकरणातील सर्व आरोपी पकडलेच पाहिजेत, विशाखाच्या खुन्याचा निषेध…… निषेध……. निषेध ! अशा घोषणा देत आज विशाखा महाडिक या महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या पालकांसह पाचशेहून अधिक ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस ठाण्यावर धडकले. विशाखाच्या खून प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता मोर्चेकऱ्यानी व्यक्त करुन आपल्या मागण्यांचे निवेदन संगमेश्वर पोलिसांना सादर केले.

कसबावासीयांनी आज काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर बोरसूतकर, पंचायत समिती सदस्य सुजित महाडिक,सरपंच अनंत शिगवण, उपसरपंच प्रसाद फाटक, प्रकाश घाणेकर, समीर कापडी आदींनी केले. कसबा चंडिका मंदीर येथून मोर्चा दुपारी 3 वा. सुरु झाला. जवळपास सहाशे मोर्चेकरी 4 वा. संगमेश्वर पोलीस ठाण्यावर धडकले. संगमेश्वर पोलिसांनी देखील आजच्या मोर्चा दरम्यान मोठा बंदोबस्त लावला होता. पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने ग्रामस्थांनी उप विभागीय अधिकारी यांच्या कडून आजच्या मोर्चाला परवानगी मिळवण्यात आली होती.

विशाखा अजय महाडिक ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी घरी परत न आल्याने 2 डिसेंबर रोजी तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाली असल्याची फिर्याद दिली होती. मात्र यानंतर संगमेश्वर पोलिसांनी तिच्या बेपत्ता होण्याचे गूढ न शोधल्याने विशाखाचे पालक हतबल झाले होते. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला नाही असे विशाखाच्या पालकांचे म्हणणे असतांनाच जवळपास 24 दिवसांनी विशाखाचा मृतदेह देवरुख नजिक मोगरवणे गावी जंगलभागात सापडला होता. देवरुख पोलीसांनी हा खूनाचा प्रकार असल्याचे ओळखून त्या दिशेने तपास करत अवघ्या 24 तासात आरोपी सुनील गुरव याला अटक केली होती. आरोपी सुनील गुरव आणि विशाखा यांची मैत्री होती . यामुळे सुनील याला विशाखाचा खून करण्यासाठी मुलगा आणि पत्नीची मदत झाल्याचा संशय विशाखाचे वडिल अजय महाडिक यांनी केला होता.

मात्र सुनील व्यतिरिक्त अन्य कोणालाही अटक न झाल्याने गत आठवड्यात कसबा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची चंडिका मंदीर येथे बैठक पार पडली. या बैठकीत अन्य आरोपी शोधून त्यांनाही अटक व्हावी आणि आरोपीला कठोर शासन होण्याच्या दृष्टीने तपास व्हावा यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. आज महिला , युवती यांच्या लक्षणीय उपस्थित हा मोर्चा संगमेश्वर पोलीस ठाण्यावर धडकला. संगमेश्वर पोलीसांना तपासाबाबतचे आणि आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. राजेंद्र महाडिक यांनी यावेळी पोलीसांना अधिकाधिक परिश्रम घेऊन यामध्ये अन्य कोणी सहभाही असतील त्यांना अटक करण्याची मागणी केली. मोर्चाचे सभेत रुपांतर झाले त्यावेळी उपस्थितांनी आपली संतप्त मनोगते व्यक्त केली.