संगमेश्वर – सोमेश्वर जुगाई आणि वाघजाई ग्रामदेवतांचा पालखी भेट सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे ग्रामदेवता श्री सोमेश्वर जुगाई वरदान व उक्षी गावची ग्रामदेवता वाघजाई यांचा सकाळी 11 वाजता बावनदी पात्रात पालखीभेट सोहळा पार पडला. कोरोना कालावधी नंतर दोन वर्षांनी आपल्या ग्रामदेवतेच्या पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी बावनदीच्या तीरावर दोन्ही बाजूला शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली होती.

धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला वांद्री येथे रात्री श्री सोमेश्वर नाट्य नमन मंडळ वांद्री यांचा नेत्रदीपक अनोखा नमनाचा सोहळा पार पडला. हंसावर आरूढ झालेला गणेश, नटेश्वर, गौळण, कृष्ण, त्यानंतर हत्तीवरून प्रेक्षकातून कंसाची स्वारी भारदस्त आवाजाने टाळ्या, शिट्यानी प्रेक्षकांनी दाद दिली. खास आकर्षण ठरलं होतं ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत झालेली रावणाची एन्ट्री. यानंतर वाघ, सांबर, दाखवण्यात आले. वाघाने पारधीवर केलेला हल्ला, वाघाच्या तावडीतून आपल्या सवंगडीला सोडवण्यासाठी झिलची धडपड हे सारं अंगावर शहारे आणणारे सिन पाहून प्रेक्षकांनीही दाद दिली होती.

आंबेड बु, कानरकोंड, मानसकोंड गावची ग्रामदेवता त्रिमुख-अंत्राळ देवी व कोळंबे-सोनगिरी गावची ग्रामदेवता सोंबा, रवळनाथ, महालक्ष्मी, जुगाई, चंडकी, त्रिमुख, वाघजाई, मानाई यांचा काल पालखीभेट सोहळा पार पडला. आंबेड येथील होमामध्ये नारळ टाकण्यासाठी कानरकोंड, मानसकोंड, आंबेड आजूबाजूच्या परिसरातील नवीन जोडपी येत असतात. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी जमली होती.