
सांगोला तालुक्यात शुक्रवार (दि. 27) रात्रीपासून शनिवारी (दि. 28) दिवसभर पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील तब्बल 27 घरांची पडझड झाली असून, 3 जनावरे दगावली. या पावसामुळे अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱयाची टंचाई निर्माण झाली असून, मुरघास खड्डय़ांमध्ये पाणी गेल्याने चारा वाया गेला आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार संतोष कणसे यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली. पावसाचे पाणी रस्त्यांवर आल्याने काही वेळासाठी रस्ते बंद पडले होते. जवळा-सांगोला तसेच धायटी-शिवणे असे मार्ग वाहतुकीसाठी बंद होते.
तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱयांवर मोठे संकट ओढावले आहे. शेतमाल, चारा, घरांची पडझड यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे शहरवासीयांचे हाल झाले. तालुक्यातील डाळिंब, केळी, पेरू, ड्रगन फ्रूट अशा विविध फळबागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. फळपिकांसह मका पिकाचे नुकसान झाले आहे. बुद्धिहाळ जलसिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी गौडवाडी, बुद्धिहाळ, उदनवाडी, पाचेगाव, हातीद, चोपडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
घरगुती पाण्याची मोटर सुरू करताना नाझरे परिसरात असणाऱया सरगरवाडी येथील गोरख संतोष सरगर (वय 28) याचे विजेचा धक्का लागून निधन झाले. सांगोला पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची नोंद झाली असून, रविवारी सायंकाळी सरगरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुडघ्याभर पाण्यातून प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे
चोपडी, नाझरे परिसरात गेले दोन दिवस प्रचंड पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद आहेत. पावसामुळे चोपडी येथील गावतळे पूर्णपणे भरले असून, येदुचामळा, रानमळा, सोमेवाडीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. आज रानमळ्यातील एका महिलेचे निधन झाले. त्या महिलेचे प्रेत गुडघ्याभर पाण्यातून ग्रामस्थांनी चोपडी येथील स्मशानाकडे आणले. प्रेतयात्रा रणमळा येथून निघाली. मात्र, गावतळ्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर असणाऱया गुडघ्याभर पाण्यातून ही प्रेतयात्रा कशीबशी बाहेर पडली.