
मराठी राजभाषा दिन आज सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. आजच्या काळात मराठी भाषा नीट बोलली जातेय का? हाच खरा प्रश्न आहे. मराठी मालिकेत तर त्याचा प्रत्यय येतोच. मात्र त्यातही काही मंडळी शुद्ध मराठीसाठी आग्रही असलेले दिसत आहेत.
मालिकेत बोलल्या जाणाऱ्या अशुद्ध मराठी भाषेविषयी, पटकथा आणि संवाद लेखिका रोहिणी निनावे म्हणाल्या, ‘‘आजच्या काळात जी आपण प्रमाण भाषा म्हणतो ती बरोबर लिहिली जावी, ती बोलली जावी याबद्दल कुणाचाही आग्रह नाही. कोणालाच काही फरक पडत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. हल्लीचे कलाकार इंग्लिश मिश्रित मराठी बोलतात. मालिकेतील कलाकार म्हणतात की, आपण लिहिलेल्या संवादातील मथितार्थ प्रेक्षकांना कळला म्हणजे झाले. मथितार्थ याचा अर्थ तरी त्यांना कळेल का हे माहीत नाही. भावना पोचल्या ना बास. असे नसते. कारण आम्ही काही विचार करून लिहिलेले असते.’’
रोहिणी निनावे पुढे म्हणाल्या, मालिकेत समजा कुटुंब कोल्हापूर, साताऱ्यातील किंवा विदर्भातील कथानकात दाखविलेले असेल तर त्या त्या मराठी भाषेचा लहेजा घेण्यास आमचा आक्षेप हा नसतोच. संवादात आपली प्रमाण भाषाच वापरली पाहिजे हे माझं वैयक्तिक मतं आहे.’’
पटकथाकार, संवादलेखर शिरीष लाटकर म्हणाले, ‘‘मला दोन मुद्दे मांडावयाचे वाटतात. एक मालिका लिहिणाऱ्या लेखकांची मराठी भाषा आणि दुसरं म्हणजे मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांची भाषा. त्यांचा भाषेचा किती अभ्यास आहे, भाषेवर किती प्रभुत्व आहे आणि भाषेवर किती मेहनत घेण्याची तयारी आहे या गोष्टींचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वीपासून अशुद्ध बोलण्यास सुरुवात झाली. बहुतांशी तरुण कलाकार हे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले असल्यामुळे मराठी भाषेची काहीच जाण नाही. याला काही अपवाद आहेत. तसेच बोली भाषा आणि भ्रष्ट भाषा यातील फरकच त्यांना कळत नाही. बोली भाषा आहे असे म्हणताना ते भ्रष्ट भाषा वापरतात. त्यामुळे ते संवाद बोलताना कुठेतरी इतर भाषेचा आधार घेतात. एका ज्येष्ठ अभिनेत्याने माझ्या संवादवर भाष्य करताना म्हटले की, शिरीष तुझ्या अलंकारिक भाषेतील संवाद बोलताना आमचा कस लागतो. काही वर्षांनी तुझ्या अलंकारिक भाषेतील संवाद पुढची पिढी बोलूच शकणार नाही. तरुण कलाकारांवर मराठी भाषेचे झालेले संस्कार कारणीभूत आहेत. अशा अशुद्ध बोलणाऱ्या मराठी भाषेतील संवाद ऐकताना प्रेक्षकांनासुद्धा सवय झाल्यामुळे हीच आपली मराठी भाषा असं अधोरेखित होऊ लागलंय.’’
>> संजय कुळकर्णी





























































