
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याच्या महानतेवर शंका उपस्थित केली आहे. संजय मांजरेकर या वेळी म्हणाले, जेव्हा जनता रविचंद्रन अश्विनला सर्वकालीन महान गोलंदाजांपैकी एक आहे असे संबोधतात तेव्हा माझ्यासाठी एक समस्या असते.
संजय मांजरेकर पुढे स्पष्ट करतात की, रविचंद्रन अश्विन याला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड या देशांमध्ये आपला ठसा उमटवता आलेला नाही. या चारही देशांमध्ये त्याने एकदाही डावात पाच बळी गारद केलेले नाहीत. दरम्यान, रविचंद्रन अश्विनने 78 कसोटी सामन्यांमध्ये 409 बळी टिपले आहेत. रविचंद्रन अश्विनने हिंदुस्थानात 286 फलंदाज बाद केले आहेत. तसेच एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी त्याने 30 वेळा बाद केले आहेत. यापैकी 24 वेळा त्याने हिंदुस्थानात ही किमया साध्य केली आहे.
जाडेजानेही तोडीची गोलंदाजी केलीय
संजय मांजरेकर यांनी आणखी एका बाबीकडे लक्ष वेधले. याप्रसंगी ते म्हणाले, हिंदुस्थानातील खेळपट्टय़ा या फिरकी गोलंदाजांना पूरक अशा असतात. रविचंद्रन अश्विनने या खेळपट्टय़ांवर दमदार कामगिरी केलीय. पण गेल्या चार वर्षांमध्ये रवींद्र जाडेजानेही त्याच्या तोडीचीच कामगिरी केलीय हे विसरता कामा नये, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
अक्षर पटेलने मिळवले जास्त बळी
संजय मांजरेकर यांनी इंग्लंडविरुद्धच्या मागील कसोटी मालिकेतील कामगिरीवरही दृष्टिक्षेप टाकताना म्हटले की, हिंदुस्थानात इंग्लंडविरुद्धची मालिका काही दिवसांपूर्वी पार पडली. हिंदुस्थानातील खेळपट्टय़ांवरही रविचंद्रन अश्विनपेक्षा अक्षर पटेल याने जास्त फलंदाज बाद केले. याच कारणांमुळे रविचंद्रन अश्विनला सर्वकालीन महान गोलंदाज म्हणून स्वीकारू शकत नाही, असे संजय मांजरेकर पुढे स्पष्ट करतात.



























































