
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि समालोचक व माजी खेळाडू संजय मांजरेकर यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. हा त्या दोघांचा खासगी मामला असून टीम इंडियाचा याच्याशी काही संबंध नसल्याचे रोहितने म्हटले आहे.
आदर करायला शिका, रवींद्र जाडेजा संजय मांजरेकर यांच्यावर भडकला
रवींद्र जाडेजा याने संजय मांजरेकर यांच्यावर टीका केली होती. त्याने मांजरेकर यांना ‘शाब्दिक हगवण’ बंद करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर टीम इंडियाने रवींद्र जाडेजाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी झाडल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत रोहित शर्माला विचारणा केली असता त्याने हा त्यांचा खासगी मामला असल्याचे म्हटले. ‘एका खेळाडूच्या दृष्टीने हे आव्हानात्मक आहे. यासारख्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीत होतच असतात आणि यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असेल. सध्या मी अशा गोष्टींपासून दूर असून इंग्लंडमधील वातावरणाचा आनंद लूटत आहे’, असे रोहित म्हणाला. रोहित पुढे म्हणाला, ‘एखाद्याने सतत तुमच्या कानात तिच गोष्ट ओरडत सांगावी हे योग्य नाही. त्यामुळे मला असे वाटते की एक क्रिकेट खेळाडू म्हणून खेळावर लक्ष केंद्रीत करण्यात यावे.’
इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये रोहित कमालीचा फॉर्मात आहे. आतापर्यंत त्याने पाच शतकं झळकावली असून एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 4 शतकं झळकावण्याचा कुमार संगकाराचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. यासह वर्ल्डक कारकीर्दीतील सचिनच्या 6 शतकांच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

























































