
खासदार संजय मंडलिक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवले असे कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले आहे. यावेळी बंडखोरांबाबत प्रतिक्रिया देताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असे आव्हानही त्यांनी दिले. कोल्हापूरची जनता त्यांना जागा दाखवून देईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरातील शिवसेनेचे 2 खासदार शिंदे गटात सामील झाले. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली असे पवार म्हणाले. संजय मंडलिकांनी कोल्हापूरकरांचा विश्वासघात केल्याचेही त्यांनी सांगितले. आता त्यांच्याही बोलण्याचीही इच्छा नसल्याचे पवार यांनी सांगितले.
आपल्याला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचे नाही. त्यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा झाला आहे. पक्षाशी एकनिष्ठ न राहण्याचा त्यांचा इतिहास आहे. पण मला वाईट वाटतं की जे आमच्याबरोबर बैठकीला उपस्थित राहून गद्दारांना धडा शिकवण्याचे प्लॅनिंग करत होते, तेच संजय मंडलिक बंडखोर गटाला जाऊन मिळाले आहेत. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच धोका दिला आहे. आता उद्धव ठाकरेंनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये. परत पक्षात स्थान देऊ नये, असेही ते म्हणाले. शिवसेना संकटात असताना मंडलिक असे वागू कसे शकतात, असा सवाल करताना त्यांना भावना अनावर झाल्या, त्यांचा ऊर भरुन आला अन् ते रडायला लागले.
बंडखोरांनी राजीनामा द्यावा, हिम्मत असेल तर निवडणूक लढवावी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केला. उद्धव ठाकरे यांनी आता गद्दारांवर विश्वास टाकू नये, असे ते म्हणाले. दोन्ही खासदार शिंदे गटात गेलेच आहेत तर माझे त्यांना आव्हान आहे, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही संजय पवार म्हणाले.




























































