
विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपड्यांचे स्थलांतर करण्यासासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. येथील पात्र झोपडपट्टीधारक स्थलांतरित होण्यास तयार आहेत. पण त्यांच्या स्थलांतरणाबाबत अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. या झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर तातडीने करण्याची मागणी शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी आज विधानसभेत केली.
आमदार संजय पोतनीस यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, कालिना विधानसभा क्षेत्रातील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील धोबीघाट ते नागदेवीपर्यंत तसेच संदेश नगर, क्रांती नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते. येथे दाटीवाटीने लोकवस्ती वसलेली आहे. या झोपड्यांचे स्थलांतर करण्यासाठी सरकारकडे मी अनेकदा पत्रव्यवहार केले आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध आयुधे वापरून यावर आवाज उठवला आहे, पण त्यावर अद्यापपर्यंत कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. यावर योग्य निर्णय घेण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव व अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक आयोजित करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी संजय पोतनीस यांनी केली.





























































