भाजपनं EVM हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊत यांचं आव्हान

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरून सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. अद्याप निर्णय दिलेला नाही. मात्र हा निर्णय होत असेल तर देशाच्या लोकशाहीसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय असेल, असे विधान शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार नेते संजय राऊत यांनी केले आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

इलेक्टोरल बॉण्डचा घोटाळा समोर आल्यानंतर देशात एक वातावरण तयार झालं आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निवडणूक कशी जिंकली जाते? भ्रष्टाचारातून कसा पैसा गोळा केला जातो? आणि तो निवडणुकीत आणला जातोय. अशाच प्रकारे लोकशाहीत देशातील जनतेचा निवडणुकीच्या यंत्रणेवरील विश्वास उडाला असेल. यामुळे जे ईव्हीएम आहे, त्याला आम्ही लोकशाही मानत नाही. मी कोणाला मतदान केलं आहे आणि कोणाला मत गेलं? हे मतदाराला कळत नसेल तर काय?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

‘देशातील जनतेत भयाचं वातावरण’

आधी मतपत्रिका होत्या त्यावर आपण शिक्का मारत होतो. कुठल्या चिन्हावर आपण शिक्का मारला आहे, हे मतदाराला माहिती होतं. पण ईव्हीएममध्ये आतापर्यंत जे निकाल समोर आले किंवा जे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. तसेच कोणालाही मत द्या, ते जाईल कमळालाच, हा जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे. कोणालाही मत द्या, ते भाजपलाच जाईल, असा प्रचार भाजप नेत्यांकडून होतोय. यामुळे देशातील जनतेत भयाचं वातावरण आहे. आम्हाला परिवर्तन हवं आहे. पण परिवर्तन करण्यासाठी मत दिल्यास ज्याला दिलं आहे, त्यालाच मिळेल का? म्हणून आम्हाला व्हीव्हीपॅट हवं आहे. आम्ही तर मतपत्रिकेद्वारे निवडणुकीची मागणी केली आहे. पण निवडणूक आयोग आणि मोदी, शहा यांचा भाजप ऐकण्यास तयार नाही. कारण ईव्हीएम सेट केलेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून व्हीव्हीपॅटचा एक पर्याय आम्ही दिला होता. ईव्हीएमविरोधात देशभरातील वकिलांनी आंदोलन केलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ईव्हीएम हटी दुर्घटना घटी. भाजपने हिंमत दाखवावी. ही लोकशाही आहे. लोकांना ईव्हीएम नकोय. संपूर्ण जगात ईव्हीएमचा कुठेही वापर होत नाहीये, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. रशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका, शेवटचा बांगलादेश होता. तिथूनही ईव्हीएम हटवण्यात आली आहे. भाजपचं ईव्हीएमवर एवढं प्रेम का आहे? हे सांगावं? कारण काहीतरी गडबड आहे, घोटाळा आहे आणि गोलमाल आहे, अशी शंका खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.